समशेरदादांच्या नगराध्यक्षपदाच्या चर्चेने शहरात उत्साह; विकासासाठी नेतृत्वावर विश्वास


स्थैर्य, फलटण, दि. ९ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवाराची चर्चा सुरु झाल्यानंतर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाला नागरिक, तरुणवर्ग, उद्योजक आणि व्यापारी बांधवांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या काही वर्षांत सामाजिक, शैक्षणिक आणि फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे. त्यांची कार्यपद्धती, सौम्य स्वभाव आणि झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे शहरातील अनेक नागरिक प्रभावित झाले आहेत. “फलटणच्या विकासासाठी खात्रीशीर नेतृत्व म्हणजे दादा,” असा विश्वास नागरिकांमध्ये वाढताना दिसत आहे.

प्रचाराच्या सुरुवातीलाच समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या वैयक्तिक भेटीगाठींच्या दरम्यान मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः युवक आणि महिला मतदारांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. मतदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांचा भर आहे.

शहराच्या विकासासाठी स्वच्छ प्रशासन, दर्जेदार रस्ते, व्यापाऱ्यांसाठी सुखसुविधा, पारदर्शक कारभार आणि रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासह नवे प्रकल्प राबवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची उस्फुर्त लाट शहरात निर्माण झाली आहे. त्यांच्या समर्थकांकडून शहराच्या विविध भागात जोरदार प्रचार सुरू असून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

येत्या काही दिवसांत प्रचाराचा जोर आणखी वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली असून, अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता आगामी काळात ही निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.


Back to top button
Don`t copy text!