
स्थैर्य, फलटण, दि. 11 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर हे कमालीचे सक्रिय झाले आहेत. त्यांनी शहरातील विविध भागांत पायी फिरून व्यापारी वर्गाशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली असून, त्यांच्या या भूमिकेला सर्वसामान्य व्यापाऱ्यांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.
समशेरसिंह नाईक निंबाळकर हे स्वतः बाजारपेठेत पायी फिरत प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन त्यांच्या अडीअडचणी आस्थेने जाणून घेत आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आणि प्रशासनाकडून होणारा त्रास यावर व्यापाऱ्यांनी त्यांच्याशी मनमोकळी चर्चा केली.
यावेळी बोलताना समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी, व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. येणाऱ्या काळामध्ये नगरपरिषदेत सत्तांतर घडवून आणून व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या सर्व अडचणी प्राधान्याने सोडवल्या जातील, असा विश्वास ते व्यापारी वर्गाला देत आहेत.
त्यांच्या या थेट संवाद मोहिमेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एक नवे आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील पायाभूत सुविधा आणि व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या या ‘पायी वारी’मुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे नगरपरिषद निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले असून, त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

