
दैनिक स्थैर्य । दि. ०३ फेब्रुवारी २०२३ । फलटण । श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे निवृत्त व्यवस्थापक संपतराव नारायण महामुलकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने डी. एड. चौक, फलटण येथील राहत्या घरी आज (शुक्रवार) निधन झाले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काका आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांचे ते वडील होत.
येथील फलटण अर्बन बँकेत आणि त्यानंतर श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेत त्यांनी व्यवस्थापक म्हणून उत्तम काम केले. अत्यंत मनमिळावू स्वभाव आणि सतत हसतमुखाने सर्वांशी आपुलकी व प्रेमाचे संबंध त्यांनी जपले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांसह आप्तेष्ट, मित्रमंडळी यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन महामुलकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. राहत्या घरापासून निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शहर व तालुक्यातील ग्रामस्थांसह आप्तेष्ट सहभागी झाले होते. येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.