संबोधीचा प्रतिष्ठानचा उपक्रम समतेचा गौरव – तुषार भद्रे


स्थैर्य, सातारा, दि. 11 ऑगस्ट : संबोधी प्रतिष्ठानचा समाजातील सर्व थरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम समतेचा गौरव प्रेरणादायी आहे.विद्यार्थ्यांनी विशेष कौशल्य आत्मसात करुन स्वतःच्या आवडीचे साम्राज्य निर्माण करावे, असे आवाहन प्रख्यात नाटककार, दिग्दर्शक, ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांनी केले.

 

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने सातारा शहरातील विविध तीस शाळा महाविद्यालयातील दहावी बारावीत उत्तम गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त, ओबीसी, ईबीसी तसेच खुल्या अशा सर्व प्रवर्गातील शंभर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तुषार भद्रे व बीडीओ, ओएसडी सतीश बुद्धे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी तुषार भद्रे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे होते. विचारमंचावर उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह अ‍ॅड. हौसेराव धुमाळ, कोषाध्यक्ष केशवराव कदम, विश्वस्त प्रा. प्रशांत साळवे, डॉ. सुवर्णा यादव, यशपाल बनसोडे उपस्थित होते.

तुषार भद्रे म्हणाले, समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा संबोधी प्रतिष्ठानचा उपक्रम हा समता तत्वाचा गौरव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले.त्याप्रमाणे विदयार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्रात साम्राज्य निर्माण करण्यासाठी अखंडपणे झगडा दिला पाहिजे. जय शिवाजी जय भवानी! जय भीम ! अशा केवळ घोषणा देण्यापेक्षा या महामानवांच्या पासून ऊर्जा, प्रेरणा घेऊन आपले ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

सतीश बुद्धे म्हणाले, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ’ शिका आणि संघटित व्हा ’ हा मोलाचा संदेश आहे. त्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यासा व्यतिरिक्त अधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी जास्तीत जास्त अवांतर वाचन करावे. उत्तम करिअर करून भविष्यात नाव कमवावे.

दिनकर झिंब्रे म्हणाले, शिक्षण सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेरचे अतिशय महाग झाले आहे. अशावेळी नवीन वेगवेगळे पर्याय शोधण्याची गरज आहे.स्पर्धा परीक्षा जीवघेण्या झाल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ट्वेल्थ फेल च्या नायका प्रमाणे ध्येयसिद्धीसाठी कमालीचा संघर्ष करण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवीन पर्व सुरू झाले आहे.या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
या कार्यक्रमात श्वेता संतोष कोरडे, स्मृती सतीश माने व सृष्टी हरिभाऊ घोडे या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली. रमेश इंजे यांनी प्रस्ताविक केले. हौसराव धुमाळ यांनी आभार मानले. प्रा. प्रशांत साळवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. सुवर्णा यादव यांनी सूत्रसंचालन केले. तेराव्या वर्षाच्या या गौरव समारंभास विनोद यादव,अनिल वीर तसेच विद्यार्थी,पालक प्रचंड संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!