
स्थैर्य, 5 फेब्रुवारी, सातारा : सातारा येथे येत्या दिनांक दोन व तीन मे रोजी होणार्या 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मराठीतील ख्यातनाम गायक शाहीर संभाजी भगत यांची निवड करण्यात आल्याची माहिती विद्रोहीचे जेष्ठ नेते डॉ. बाबुराव गुरव, अॅड. सुभाष पाटील, कॉ. धनाजी गुरव यांनी दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. सुहास महाराज फडतरे, कार्याध्यक्ष विजय मांडके, सरचिटणीस अॅड. राजेंद्र गलांडे, प्रा. गौतम काटकर आदी उपस्थित होते.
शाहीर संभाजी भगत हे मुळचे पाचगणी जवळील महू गावचे. संभाजी भगत हे लहानपणापासूनच गावातल्या कलावंतांची गायकी ऐकतच मोठे झाले. भजन व भारुडांवर संभाजी भगत याचा कलावंत पिंड पोसला गेला. पुढे ते मुंबईत आले. डाव्या चळवळीशी जोडले गेले. संभाजी भगत यांनी अनेक पोवाडे गायले आहेत. राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळालेल्या ’कोर्ट’ या चित्रपटातील गाणे त्यांनी गायले आहे. ’शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या आगळ्यावेगळ्या अशा नाटकामुळे त्यांना नवी ओळख मिळाली. या नाटकाची मूळ संकल्पना, नाटकातील गीते व संगीत संभाजी भगत या नाटकाला त्यानंतर शिवाजी अंडरग्राउंड ची दिल्लीची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा भरवीत असलेल्या आंतरराष्ट्रीय भारंगम नाट्य महोत्सवासाठी निवड झाली.
संभाजी भगत यांनी लिहिलेले लेखन साहित्य व इतर, अडगळ (नाटक), कातळाखालचे पाणी (आत्मचरित्र), तोड ही चाकोरी (गाण्यांचा संग्रह), रणहलगी (लेख संग्रह), उंदीर नावाचे भारुड आणि गिरणीचा वग हे मुक्तनाट्य संभाजी भगत यांनी 5 व्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन आणि पहिल्या लोक सांस्कृतिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलं आहे. ’सरपंच भगिरथ’ आणि ’नागरिक’ या चित्रपटाना संभाजी भगत यांनी संगीत दिले. तर, ’फनरल’ आणि ’तुझ्या आईला’ या चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. संभाजी भगत यांना अस्मितादर्श पुरस्कार, मिफ्ता पुरस्कार, प्रबोधन मित्र पुरस्कार, संत तुकाराम हे पुरस्कार मिळाले आहेत.
सातार्यात 22 वर्षानंतर विद्रोही साहित्य संमेलन
सातारा येथे यापूर्वी 4 थे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन 2002 मध्ये झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव त्या साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष होते. आता 22 वर्षानंतर पुन्हा एकदा सातार्यात विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
विद्रोही साहित्य संमेलनांचा प्रवास व अध्यक्ष
पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलन धारावी (मुंबई) येथे पार पडल्यानंतर कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद), सातारा, सावंतवाडी, पंढरपूर, धुळे, सोलापूर, इंदापूर, सांगली, राहुरी, बीड, शहादा, पुणे या ठिकाणी संमेलने झाली आहेत. आजपर्यंत झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बाबुराव बागुल, वाहरू सोनावणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. बाबा आढाव, राजन खान, डॉ. आ. ह. साळुंखे, राजाभाऊ शिरगुप्पे, डॉ. बाबुराव गुरव, रुप बोधी-कुलकर्णी, नजुबाई गावित, डॉ. भारत पाटणकर यांनी भूषविलेली आहेत.

