साताऱ्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे महाराजांना अभिवादन


 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साताऱ्यात सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन. याअंतर्गत महाड सत्याग्रह शताब्दी आणि संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम व योजनांचे वाटप करण्यात आले.

स्थैर्य, सातारा, दि. १० एप्रिल : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी आणि त्यांच्यात जनजागृती निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने साताऱ्यात ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने विविध प्रबोधनात्मक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाड सत्याग्रहावर व्याख्यान आणि लघुनाट्य

या समता सप्ताहाअंतर्गत गुरुवारी (दि. ९ एप्रिल) सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये चवदार तळे (महाड) येथील सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्राध्यापक निरंजन फरांदे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

तसेच, संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून ब्रम्हपुरी (ता. कोरेगाव) येथील माध्यमिक आश्रमशाळेचा विद्यार्थी कु. साहील हंडाळ याने संत गाडगे बाबांच्या जीवनकार्यावर आधारित अतिशय सुंदर लघुनाट्य सादर केले.

कल्याणकारी योजनांचे वाटप आणि गुणवंतांचा सत्कार

याप्रसंगी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आला. यामध्ये मिनी ट्रॅक्टर, विंधन विहीर बांधणी व विद्युत जोडणी (अनु. जाती उपयोजनेंतर्गत) आणि गटई स्टॉल यांचा समावेश होता.

याचबरोबर, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत खून किंवा मृत्यू प्रकरणातील वारसांना शासकीय सेवेत नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, शासकीय वसतिगृहामध्ये शिक्षण घेऊन उच्च पदांवर निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (सातारा) येथील माजी विद्यार्थी आणि विद्यमान गटविकास अधिकारी (वर्ग १) श्री. दत्तात्रय खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “माझ्या या यशात आणि जडणघडणीत शासकीय वसतिगृहाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे,” अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

मान्यवरांची उपस्थिती

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, जिल्हा जाती पडताळणी उपायुक्त उमेश घुले, समाज कल्याण सहायक आयुक्त सुनील जाधव, विशेष अधिकारी श्रुती रकटे यांच्यासह कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, समतादूत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!