दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । सातारा । जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव’ या वाक्यात ज्यांचे जीवितकार्य संक्षिप्तरूपात सामावले आहे, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातारा शहरात ‘जयभीम’चे नारे घुमले. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारो भीम अनुयायांनी मंगळवारी साताºयात हजेरी लावली. विविध कार्यक्रम व उपक्रमांतून महामानवाला अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूण आयुष्य गोरगरीबांच्या उद्धारासाठी खर्ची घातले. त्यांनी शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला. असे असामान्य व्यक्तीमत्व ६ डिसेंबर १९५६ रोजी पंचतत्वात विलीन झाले. तेव्हापासून ६ डिसेंबर रोजी महामानवाला अभिवादन केले जात आहे. मंगळवारी बाबासाहेबांच्या ६६ वा महापरिर्वाणदिनानिमित्त त्यांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले
सातारा शहरात नगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सकाळपासूनच भीम अनुयायांची गर्दी दिसून आली. दिवसभर शहराच्या विविध भागांतून अनुयायांचे जथेच्या जथे शुभ्र वस्त्रे परिधान करून आदरांजली वाहण्यास येत होते. या ठिकाणी भीम अनुयायांकडून सकाळी त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करण्यात आले. सायंकाळी सात वाचता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सदर बझार येथे भीम अनुयायांकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये भीम अनुयायांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.