शाळा परिसरात तंबाखू, सिगारेट विक्री

धनंजय कदम यांचे अन्न व औषध प्रशासनास निवेदन


दैनिक स्थैर्य । 14 जुलै 2025 । सातारा । सातारा शहरात शाळेपासून 100 मीटर अंतरावर गुटखा, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री बंद करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते धनंजय कदम यांचे अन्न व औषध प्रशासनास निवेदन दिले.

या निवेदनात सातारा शहरात असे निदर्शनास आले आहे, की बर्‍याच ठिकाणी शाळेपासून जवळच मोठ्या प्रमाणात अतिक्रमित टपर्‍या, दुकाने, हॉटेल असून, त्यामध्ये गुटखा, तंबाखू, सिगारेट यांची विक्री राजरोसपणे केली जात आहे, असे आढळून आले आहे.

विशेष करून सदरबझार, कल्याणी शाळा या परिसरातअशाप्रकारे खुलेआम विक्री करताना दिसत आहे. नगरपालिका अतिक्रमित दुकाने, टपर्‍या यावर कोणतीच कारवाई करत नाही. सकाळी शाळेच्या अवतीभोवती गुटखा, तंबाखू, सिगारेट यांची पाकिटे पडलेली आढळून येतात.

शासनाच्या नियमानुसार शाळेच्या 100 मीटर अंतरावर या विक्रीवर बंदी आहे, असा जीआर आहे. हे सर्वांना माहीत आहे, तरी सुद्धा कोणत्याहीप्रकारची कारवाई केल्याचे दिसून येत नाही. आपल्या प्रशासनाकडून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.काही तपासणी अधिकार्‍यांचे आर्थिक हितसंबंध या ठिकाणी जोपासले जातात, अशी शंका आहे.

तरी आपल्या प्रशासनाने संपूर्ण शहरात या विषयी कडक मोहीम राबवावी जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांवर याचे वाईट परिणाम होणार नाहीत.त्यामुळे यावर लवकरात लवकर कारवाई केलेली आढळून न आल्यास आंदोलन किंवा उपोषणासारखा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशारा या वेळी धनंजय कदम यांनी अन्न औषध प्रशासनला निवेदनाद्वारे दिला.


Back to top button
Don`t copy text!