साताऱ्यात रस्त्यावरील मंदिरासमोर दारू विक्री, हिंदुत्ववादी संघटनेचे मौन तर पोलीस कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि 19 : सातारा शहरात रविवार पेठ ते तहसिलदार कार्यालय परिसरात  एका वजनदार नेत्यांच्या निष्ठावंत कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या तनु-मनू ने दारूच्या गुत्याचा धंदा सुरू केला आहे. अतिक्रमणाला संरक्षण मिळावे यासाठी     गणेश मंदिराची उभारणी केली व श्री च्या मुर्तीं समोरच रिकाम्या दारूच्या बाटल्याचा खच लावला.याबाबत काही हिंदुत्ववादी संघटनांनी मौन धारण केले होते पण, लॉक डाउन काळात सातारा शहर पोलिसांनी कायद्याचा टाळा उघडून श्री गणेशाची विटंबना करणाऱ्या विरोधी कारवाई केली.

सातारा शहरात राष्ट्रीय सण, युग पुरुषांची जयंती व ड्राय डे व नेमके लॉकडाऊनच्या दिवशीच या बहुगुणीने बेकायदेशीर रित्या  दारूच्या बाटल्या विक्री करण्याचा गोरख धंदा सुरू केला होता. तसेच रस्त्यावरच बेकायदेशीर खोकी टाकून भाडयाने देण्याचा महाप्रताप उद्योग आहे.सातारा जिल्हाधिकारी यांनी लॉक डाऊन जाहिर केले तरी अधिकृत दारू दुकानातून दारू विक्रीसाठी आणली गेली होती.याची अधिक चर्चा होत असल्याची सातारा शहर पोलिसांना खबर लागली. पोलिसांनी प्रकरण चांगलेच गाजू नये म्हणून नेत्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या रविवार पेठेतील बेकायदेशीर दारू  गुत्यावर  अचानक शनिवारी दुपारी धाड टाकली. कर्तव्यदक्ष पोलिसांना बघताच त्या गुतेदाराच्या नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडाली मात्र, दोन्ही कार्यकर्ते क्षणातच अदृश्य झाले.पण, पोलिसांनी तानाजी बडेकर आणि अजय घाडगे या दोघांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या गुत्यावरून पन्नास हजार रुपयांची देशी -विदेशी दारू हस्तगत केली आहे.

सातारा शहरातील प्रांताधिकारी व तहसिलदार कार्यालयासमोर रविवार पेठ व नगर पालिका शॉपिंग सेंटर या परिसरात गेल्या काही वर्षात  बेकायदेशीर दारूच्या बाटल्या ज्यादा दराने विक्री केली जाते. तसेच जिल्हा परिषद पदाधिकारी निवासस्थान संरक्षक भिंत लगत टपऱ्या काढू नयेत म्हणून श्री गणेश मंदिर पत्र्याचे खोकी मध्ये स्थानापन  केले आहे.  त्या मंदिराच्या बाजूला रिकाम्या बाटल्याची पोती ठेवण्यात येत आहेत.त्यामुळे या मंदिरातील परिसरात धूप ऐवजी दारूचा वास दरवळत असतो. नवलाईची बाब म्हणजे येथील तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मौन बाळगून असतानाच सातारा पोलिसांनी धाड टाकून ‘तेजस्वी’कामगिरी केली आहे.

सातारा येथील  पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपअधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे व पोलिसांनी छापा टाकला. साताऱ्यातील नेत्यांचे कार्यकर्ते तानाजी बडेकर आणि अजय घाडगे हे  पसार झाले.

त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून  त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व त्यांचे पथकातील पो.हवा.प्रशांत शेवाळे ,पो.ना.शिवाजी भिसे,पोना,अविनाश चव्हाण,पो.कॉ.अभय साबळे,किशोर तारळकर,विशाल धुमाळ,गणेश घाडगे,संतोष कचरे यांनी शोध मोहीम सुरू केली असून त्यांना साथ देणाऱ्यांना सह आरोपी  करण्याच्या हालचाली सुरू कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!