
दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२२ । सातारा । महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनांसाठी बाजारपेठ निर्माण व्हावी या उद्देशाने नववर्षाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या लोकल बोर्ड नजीकच्या वाहन तळाच्या जागेत दि. 29 व 30 डिसेंबर 2022 दरम्यान स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादित वस्तूंचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये स्वयंसहाय्यता गटांच्या उपजीविका वृद्धीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील एकूण 25 स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादित वस्तूंचे जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये विक्री व प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सदर प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारचे मसाले, अस्सल इंदायणी तांदूळ, आयुर्वेदिक उत्पादने, कोरफड लाडू, गोधडी, कापडी व कागदी पिशव्या, खेळणी, मशरूम बिस्किटे व मध इ. निवडक व नाविन्यपूर्ण उत्पादनांचा समावेश आहे.
या प्रदर्शनासाठी सातारकरांनी भेट देऊन महिला स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादित वस्तू खरेदी करून गटातील महिलांचा उत्साह व आनंद द्विगुणीत करावा असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी केले आहे.