लेखी पत्राद्वारे नगराध्यक्षांकडून मागणी
स्थैर्य, सातारा दि 10 : गणेशोत्सव अगदी अकरा दिवसांवर येऊन ठेपला आहे . करोनाच्या संक्रमण काळात गणेशोत्सवाच्या काळात कोणत्या नियमावलीचे पालन करावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक घ्यावी अशी लेखी विनंती नगराध्यक्ष माधवी कदम यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे .
हे पत्र सामान्य प्रशासन विभागाने नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना केले . माधवी कदम यांनी दिलेल्या पत्रात नमूद आहे की, सातारा शहरात एकूण 95 कंटेन्मेंट झोन असून पैकी 67 झोन आजअखेर सक्रीय आहेत . त्यामुळे करोनाच्या संक्रमणात सातत्याने वाढ होत आहे . गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसावर येऊन ठेपला असून संक्रमण टाळून सुरक्षित डिस्टन्सिंग ठेवत बाप्पाची आराधना कशी करायची ? याची नियमावली जाहीर करण्याची विनंती नगराध्यक्ष माधवी कदम यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याकडे केली .बकरी ईद सणासाठी ज्याप्रमाणे शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली तशीच बैठक तातडीने बोलवण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली . या बैठकीत नियमावली जाहीर झाल्यास मंडळांच्या अध्यक्षांना कोणतेही संभ्रम राहणार नाही असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे .
मूर्तीची उंची प्रमाणित व्हावी
सातारा शहरात देखाव्या पेक्षा उंच मूर्ती बसवण्याचा कल आहे. यंदा तो कल गणेश भकतांना कोविडमुळे बाजूला ठेवावा लागेल. कुंभारवाडयात ज्या मूर्ती बनविल्या जात आहेत त्याची उंची साडेचार फुटापेक्षा जास्त नाही. त्यामुळे श्री मूर्तीच्या उंची संदर्भाचा महत्वाचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागेल. सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एक गाव एक गणपती या सारख्या सामूहिक उत्सवाचे निर्णय होत आहेत. साताऱ्यातील सर्व मंडळांनी तो समंजसपणा दाखवण्याची मागणी होत आहे.