
स्थैर्य, फलटण, दि. २५ ऑगस्ट : श्री समर्थ रामदास स्वामी महाराज संस्थान, सज्जनगड यांच्या वतीने श्रावण महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीभीमरूपी स्तोत्र पठण’ या ऑनलाइन उपक्रमाला महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातसह परदेशातूनही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमात एकूण १,३१० भाविकांनी सहभाग नोंदवला असून, संपूर्ण श्रावण महिन्यात तब्बल ५ लाख ५१ हजार ३८३ वेळा श्रीभीमरूपी स्तोत्राचे पठण झाले.
श्री समर्थ रामदास स्वामींनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात कृष्णा नदीच्या काठी ११ मारुतींची स्थापना केली होती. त्याच वेळी त्यांनी श्रीभीमरूपी स्तोत्राची निर्मिती केली, जे आज महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले आहे. ही उपासना आणि परंपरा अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने सज्जनगड संस्थानाने या वर्षी श्रावण महिन्यात स्तोत्र पठणाचा संकल्प केला होता.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्ताला श्रावण महिन्यात किमान १२१ वेळा पठण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये लहान मुले, तरुण आणि वृद्ध स्त्री-पुरुषांनी मोठ्या मनोभावे सहभाग घेतला. या प्रचंड प्रतिसादाबद्दल कृतज्ञता म्हणून, संस्थानच्या वतीने सहभागी झालेल्या सर्व भक्तांना ‘श्रीसमर्थ प्रसाद’ घरपोच पाठवण्यात येणार आहे.
यासोबतच, पठण करणाऱ्या भक्तांकडून त्यांचे अनुभव लेखी स्वरूपात (मनोगत) मागवण्यात आले आहेत. ही सर्व मनोगते श्री समर्थांच्या समाधी चरणी अर्पण केली जाणार असून, त्यातील काही निवडक मनोगतांना संस्थानच्या ‘रघुवीर समर्थ’ या मासिकात प्रसिद्धी दिली जाईल.