स्थैर्य, फलटण, दि. २० : सध्या फलटणसह सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना या आजाराचे रूग्ण झपाट्याने वाढलेले आहेत. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी सध्या बेड्स उपलब्ध होत नाहीत. हे जाणूनच फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी त्यांच्या स्वमालकीच्या सजाई गार्डन मंगल कार्यालय येथे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला व तातडीने कार्यवाही करून कोरोना केअर सेंटर सुरू सुध्दा करण्यात आले. ह्या कोरोना केअर सेंटरला जिल्हा परिषद व पंचायत समितीचे संपुर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
सजाई गार्डन मंगल कार्यालयामध्ये असणार्या कोरोना केअर सेंटरला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी गौडा बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गट विकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर, फिरोज पठाण, अमोल भोईटे, अमित भोईटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
सध्या कोरोनाबाधित रूग्णांना तातडीने उपचार मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे. आगामी काळामध्ये कोरोना बाधित रूग्णांना तातडीने बेड्स मिळण्यासाठी सजाई गार्डन मंगल कार्यालय येथे सुरू करण्यात येत असलेल्या कोरोना केअर सेंटर हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असुन ह्या कोरोना केअर सेंटरसाठी लागणारी सर्व औषधे ही जिल्हा परिषद मार्फत दिली जातील व ह्या सोबतच जी काही मदत कोरोना काळात फलटण तालुक्याला लागेल ती सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात येईल, असा विश्वास या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केला.