स्थैर्य, सातारा, दि.१९: छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला तो प्रतापगड. त्या प्रतापगडाच्या तटबंदीच्या बुरुजाखालील भाग गतवर्षी पावसाळय़ात ढासळला होता. अस्मानी संकट चालून आले होते. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळय़ांनी शिवभक्तांच्या सहकार्याने प्रतापगडाच्या तटबंदीचे संवर्धनाचे कार्य हाती घेतले. ऑगस्ट 2020 ला प्रतापगडावर पण केला अन् तो केवळ अकरा महिन्यात पूर्ण केला. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळय़ांनी शिवभक्तांच्या सहकार्याने प्रतापगडाच्या तटबंदीच्या संवर्धनाचे कार्याची मोहिम केवळ 94 दिवसात फत्ते करण्यात आली. काम पूर्ण झाल्याची घोषणा मंगळवारी खासदार उदयनराजेंनी केली असल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली.
मागच्या पावसाळय़ात जुन महिन्याच्या सुरुवातीला प्रतापगडाची तटबंदीच्या पायाखालील भागाचे भुसखलन झाल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळय़ांना मिळाली. अन् मावळय़ांच्या डोळय़ात अश्रू तरळले. सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे हे शिवभक्तांसह गडावर पोहचले अन् त्यांनी तेथेच पण केला अन् कार्याला सुरुवात झाली. सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळय़ांनी हाती घेतले संवर्धनाची कार्य. जून 2020 मध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या बैठका पूर्ण झाल्यानंतर राजधानी साताऱयात खासदार उदयनराजे आणि राजमाता कल्पनाराजे यांची भेट घेवून दि. 13 जुलै 2020 ला त्यांचे आर्शीवाद घेतले. आमदार शिवेंद्रराजे यांचेही दि.14 जुलै 2020 रोजी आर्शीवाद घेवून मोहिमेची पुढची घौडदौड कायम ठेवली.
पुरातत्व विभागाची परवानगी महत्वाची असल्याने पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास व्हाळे आणि महाराष्ट्राचे डॉ. तेजस गर्दे यांनी परवानगी दिली. त्यानंतर वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर आणि सहाय्यक संचालक विलास व्हाळे यांनी परवानगी दिली.
असे झाले बांधकाम
बांधकाम करणार कोण असाही प्रश्न सह्याद्रीच्या मावळय़ांपुढे उभा होता. त्याकरता चंदनकर इंजिनीअरीग रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत चर्चा झाल्या. गजेंद्र गडकर यांच्याशी मिटींग झाल्या. कॉलेज ऑफ इंजिनिअरीगं डॉ. भोसले यांच्याशी बैठका झाल्या. अन् डिझाईन तयार केले. स्थानिकांच्या हस्ते कामाचे भूमिपुजन 27 जानेवारी 2021 ला करण्यात आले. गडावर मशिनरीचे सुट्टे पार्ट नेवून जोडले अन् अत्याधुनिक यंत्रणा वापरुन काम करण्यात आले. त्यामध्ये शॉटक्रिट फवारणी तंत्रज्ञान, ड्रिलींग, बोलटिंग-ग्राऊटींग, तटबंदीच्या पायावर वजन न वाढवता, जिओ फोम, जिओ नेट, वायर रोप, बेअरिंग प्लेटचा वापर करण्यात आला. बांद्रा सिलिंकला जी वायर रोप लागली ती येथे वापरण्यात आली. लोखंडी ताराची जाळी, तराई काम करण्यात आले. अन् अखेर 1 मे 2021 ला काम पूर्ण झाले.
22 दिवसात 21 लाखांचा निधी
संवर्धनाचे कार्य हाती घेतले अन् त्यासाठी आर्थिक बाब महत्वाची होती. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळय़ांनी आवाहन करताच अभिजीत पानसे यांनी फोन करुन मदत केली. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाच लाख रुपयांचा निधी दिला. अनेक संस्था, शिवभक्त सह्याद्री प्रतिष्ठानच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. मग कोणी मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने असेल, कोणी पत्नीच्या वाढदिवसानिमित्ताने असेल, कोणी आईच्या पुण्यतिथीनिमित्ताने असेल कोणत्याही कारणामुळे अर्थसहाय्य मिळत राहिले. अवघ्या 22 दिवसात 21 लाखाचा निधी उभा राहिला. त्यात फत्तेशिखस्त, फर्जद चित्रपटाचे दिग्दर्शक दिपा लांजेकर, अजय बोरकर, रमेश परदेशी, अजय तापकिरे, प्राजक्ता माळी, माधुरी पवार या सर्वांनी देणग्या दिल्या. तसेच त्यांनीही आवाहन केले, अशी माहिती श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली.
खासदार उदयनराजेंनी काम पूर्ण केल्याची घोषणा
मंगळवारी जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांची सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळय़ांनी भेट घेतली. केलेली मोहिम फत्ते झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी प्रतापगडाच्या तटबंदीच्या पायाचे संवर्धनाचे काम पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे, अशी माहिती श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली.
दीपक प्रभावळकर यांच्यामुळे दहा हत्तीचे बळ
शिवराज्यभिषेक समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर यांच्यामुळे प्रतापगड तटबंदीच्या पायाच्या संवर्धनाच्या कामासाठी सह्याद्री प्रतिष्ठानला दहा हत्तीचे बळ मिळाले, असेही श्रमिक गोजमगुंडे यांनी सांगितले.