सह्याद्री कदमांच्या प्रवेशाने फलटण तालुक्यात भाजप-राष्ट्रवादी ‘स्ट्रॉन्ग’


नगरपालिका निवडणुकीत ‘राजे गटा’च्या सुकाणू समितीत असलेले युवा नेते सह्याद्री कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केल्याने फलटणमध्ये भाजप-राष्ट्रवादी युती अधिक मजबूत झाली आहे. मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

स्थैर्य, फलटण, दि. ०८ जानेवारी : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर फलटणच्या राजकारणात मोठे उलथापालथ झाली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत ‘राजे गटा’च्या सुकाणू समितीत सक्रिय भूमिका बजावणारे युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम यांनी आज राजकीय यू-टर्न घेत ‘घड्याळा’ची साथ दिली. सातारा येथे आयोजित भव्य सोहळ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. सह्याद्री कदम यांच्या या निर्णयामुळे फलटण तालुक्यात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीची ताकद वाढली असून, आगामी निवडणुकांमध्ये युतीचे पारडे जड झाले असल्याचे आता बोलले जात आहे.

या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील, राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर आणि फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नगरपालिका ते जिल्हा परिषद : बदललेली समीकरणे

नगरपालिका निवडणुकीत सह्याद्री कदम हे राजे गटाच्या सुकाणू समितीत होते, त्यामुळे त्यांची ताकद त्या गटाला मिळाली होती. मात्र, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या उंबरठ्यावर त्यांनी अजितदादांच्या पक्षात प्रवेश केल्याने आता समीकरणे बदलली आहेत. “सह्याद्री कदमांची ताकद आता भाजप-राष्ट्रवादी महायुतीला मिळणार असल्याने आगामी निवडणुकांमध्ये ‘खासदार गटा’चे पारडे जड मानले जात आहे,” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

‘विकासासाठी सत्तेची साथ’

पक्षात प्रवेश केल्यानंतर बोलताना सह्याद्री कदम म्हणाले, “समाजसेवा आणि विकासाभिमुख राजकारण हीच राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख आहे. युवकांना संधी देणाऱ्या या पक्षात काम करणे प्रेरणादायी आहे. आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेन.”

‘फलटणमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली’

मंत्री मकरंद पाटील यांनी सह्याद्री कदम यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, “सह्याद्री भैय्यांच्या प्रवेशामुळे फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आणि पर्यायाने महायुतीची ताकद निश्चितच वाढली आहे. पक्षात त्यांना त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान दिला जाईल.”

या कार्यक्रमास सह्याद्री भैय्यांवर प्रेम करणारे फलटण तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते, पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा येथे झालेला हा प्रवेश सोहळा फलटणच्या आगामी राजकारणाची दिशा बदलणारा ठरला आहे.


Back to top button
Don`t copy text!