थरार! सिग्नलला लाल फडके बांधून सह्याद्री एक्स्प्रेस थांबवली; शेणोलीजवळ रेल्वेत दरोडा, प्रवाशांचे दागिने लुटले


 कऱ्हाड तालुक्यातील शेणोलीजवळ कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेस सिग्नलला लाल फडके बांधून थांबवत दरोडेखोरांनी प्रवाशांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

स्थैर्य, शेणोली (कऱ्हाड), दि. १२ एप्रिल : कोल्हापूर-पुणे ‘सह्याद्री स्पेशल एक्स्प्रेस’ सिग्नलवर लाल फडके टाकून थांबवत मध्यरात्रीच्या सुमारास प्रवाशांना लुटल्याचा थरारक प्रकार घडला आहे. कऱ्हाड तालुक्यातील शेणोलीजवळ शुक्रवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांनी रेल्वेच्या खिडकीतून हात घालून प्रवाशांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल लंपास केले आहेत. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिसांत चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिग्नलवर लाल कपडा टाकून कट

मीना विकास उमापती (रा. मिरज) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मीना उमापती या त्यांचा भाऊ मनश्शे इट्टे आणि आईसह मिरज येथून कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेसने पुण्याकडे निघाल्या होत्या.

शुक्रवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास दोन ते चार अज्ञात व्यक्तींनी शेणोली रेल्वे स्टेशन येथील मिरज बाजूकडील आऊटर सिग्नलवर एक लाल रंगाचा कपडा टाकला. सिग्नल लाल दिसल्याने मोटरमनने ही स्पेशल गाडी त्याठिकाणी थांबवली. चोरट्यांचा हा पूर्वनियोजित कट होता.

खिडकीतून हात घालून लुटमार

गाडी थांबताच अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी डब्याबाहेरून खिडकीतून हात घातला. त्यांनी फिर्यादी मीना उमापती आणि त्यांच्या सहप्रवासी आशा नारायण पवार यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खिडकीतून ओढून नेली. त्याचबरोबर आणखी एक सहप्रवासी रंजन दयानिधी साहू यांचा मोबाईल फोनही चोरट्यांनी खिडकीतून खेचून पळवला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली.

रेल्वे यंत्रणा सतर्क अन् पोलिसांची धाव

अचानक सिग्नल बंद झाल्याने आणि गाडी थांबल्याने रेल्वेची यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. शेणोलीतील यंत्रणेकडून तातडीने मिरज आणि कऱ्हाड येथील अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. नेमका प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्यात आली.

  • प्रवाशांना लुटल्याची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, सोलापूरचे रवींद्र गायकवाड यांच्यासह मिरज लोहमार्ग पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

  • याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिसांत अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक फौजदार मुर्दे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!