कोळकीच्या रणांगणात ‘सह्याद्री’चा ‘महा-यू-टर्न’; अजितदादांना ‘जय महाराष्ट्र’ करत अखेर राजे गटाकडून उमेदवारी दाखल!


स्वर्गीय आमदार चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री कदम यांनी कोळकी जिल्हा परिषद गटातून राजे गटाच्या (शिवसेना) वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. अवघ्या १० दिवसांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केलेल्या सह्याद्री यांनी तिकीटासाठी पुन्हा ‘यू-टर्न’ घेतल्याने कोळकीत राजकीय चर्चांना उधाण. वाचा त्यांच्या ‘अजब’ राजकीय प्रवासाची कहाणी…

स्थैर्य, फलटण, दि. 22 जानेवारी : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी फलटणमधील कोळकी गटात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांचे वारसदार सह्याद्री चिमणराव कदम यांनी अखेरच्या क्षणी मोठी पलटी मारत शिवसेना (राजे गट) यांच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या १०-१५ दिवसांपूर्वीच त्यांनी साताऱ्यात अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, तिथे तिकीट न मिळाल्याने त्यांनी अजितदादांना ‘जय महाराष्ट्र’ करत पुन्हा राजे गटाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. या घटनेमुळे “निष्ठावंत बापाचा वारसा सांगणाऱ्या मुलाची भूमिका प्रत्येक निवडणुकीत का बदलते?” अशी चर्चा कोळकी गटात रंगली आहे.

भाजप ते शिवसेना: सह्याद्री कदमांचा ‘राजकीय प्रवास’

सह्याद्री कदम यांचा राजकीय आलेख हा सतत बदलत्या भूमिकांचा राहिला आहे, तो खालीलप्रमाणे:

१. भाजपमध्ये ‘ग्रँड एंट्री’ पण यश नाही : राजकारणात सक्रीय झाल्यानंतर सह्याद्री कदम यांनी सुरुवातीला भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर काही काळ ते राजकीय अज्ञातवासात गेले होते.

२. शरद पवारांची ‘लंच डिप्लोमसी’ : सन २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांना साथ दिली. विशेष म्हणजे, यावेळी खुद्द शरद पवार हे सह्याद्री कदम यांच्या घरी भोजनासाठी आले होते. गेल्या ३० वर्षांत फलटणमध्ये रामराजेंचा पाहुणचार सोडल्यास पवारांनी खूप कमी ठिकाणी पाहुणचार स्वीकारला आहे, त्यामध्ये सह्याद्री कदम यांचे नाव जोडले गेले होते.

३. विधानसभेला ‘तुतारी’, नगरपालिकेला ‘बंडखोरी’ : लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राजे गटासोबत माजी आमदार दीपक चव्हाण (तुतारी) यांचा प्रचार केला. मात्र, त्यानंतर लागलीच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत, राजे गटाच्या सुकाणू समितीत असूनही, आपले समर्थक सुरज कदम यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी राजे गटाला रामराम ठोकला आणि सुरज कदम यांचा अपक्ष अर्ज भरून राजे गटाच्या विरोधात काम केले.

४. पंधरा दिवसांत दोन पक्ष बदलले : नगरपालिका निवडणुकीनंतर, अवघ्या १०-१५ दिवसांपूर्वी सह्याद्री कदम यांनी साताऱ्यात मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता. जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील होते. मात्र, अजित पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा कोलांटीउडी मारत राजे गटात (शिवसेना) प्रवेश केला आणि कोळकी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

वडिलांची ‘निष्ठा’ वि. मुलाची ‘अस्थिरता’

सह्याद्री कदम यांच्या या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे जुने जाणते कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांचे वडील, माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम हे काँग्रेस पक्षाशी आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. पक्षातील अंतर्गत विरोध सहन करूनही त्यांनी कधीही पक्ष सोडला नाही. चिमणरावांनी ठरवले असते तर ते कधीही भूमिका बदलून लाल दिव्यातून फिरले असते, पण त्यांनी तत्त्वाशी तडजोड केली नाही. याउलट, त्यांचा वारसा चालवणारे सह्याद्री कदम मात्र प्रत्येक निवडणुकीच्या वेळी सोयीनुसार भूमिका बदलत असल्याने कोळकी गटातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!