सहापदरी बायपासमुळे दळणवळण सुलभतेसह विकासाला चालना मिळेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ मार्च २०२२ । भंडारा । राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी भंडारा बायपासमुळे रायपूर-बिलासपूर-कलकत्ता ही प्रमुख शहरे जोडल्या जातील. शंभर किलोमीटर प्रतीतास गतीमुळे वाहतूक, दळणवळण सुलभ होईल. परिणामी भंडाऱ्याच्या विकासाला या बायपासमुळे गती मिळेल, असे आश्वासक प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

भंडारा बायपासच्या डिजीटल भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार परिणय फुके, जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते, पंचायत समितीचे सदस्य, राजेश वंजारी, भगवान हरडे, गिरोलाचे सरपंच भजन भोंडे, माजी खासदार  शिशुपाल पटले, माजी आमदार बाळा काशिवार, चरण वाघमारे, रामचंद्र अवसरे, हेमकृष्ण कापगते, शिवराम गिऱ्हेपुंजे, केशव मानकर, सरपंच भजन भोंडे, जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी राजीव अगरवाल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापक आशिष अस्ती, व्यवस्थापक नरेश वड‌्डेटीवार, प्रकल्प संचालक एन. एल. येवतकर उपस्थित होते.

उत्तम रस्त्यामुळे दळणवळण व पर्यायाने उद्योगवाढीला चालना मिळेल, असे सांगून श्री. गडकरी म्हणाले की, अंभोरा पुलाची पाहणी केली असता तेथे पर्यटकांना आकर्षित करणारे उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित करता येईल. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. गोसीखुर्द धरण परिसरात बोटींग व उत्तम रेस्टॉरंट, साहसी खेळांचे विविध प्रकार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आहेत. भविष्यात नागपूर – भंडारा मेट्रोने व रोपवेने जोडण्यात येईल. साकोली, लाखनी व तुमसर येथील पूर्ण झालेल्या पूलांचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा बायपासमुळे वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल असा विश्वास व्यक्त केला. तर आमदार परिणय फुके यांनी नागपूर – तुमसर रस्ता व तुमसरवरून बायपास करून देण्याची मागणी केली.

भंडारा जिल्हावासीयांना या सहापदरी बायपासची निकड होती, ती पुर्ण केल्याने खासदार सुनिल मेंढे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भंडारा – नागपूर या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी हा रस्ता ही सहापदरी करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रस्तावित बायपास विषयीचे संगणकीय सादरीकरण यावेळी करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापक आशिष अस्ती यांनी प्रास्ताविक, संचालन रेणुका देशकर तर आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक श्री. येवतकर यांनी केले.

बायपासची प्रमुख वैशिष्ट्ये : भंडारा बायपास हा 100 कि. मी. प्रतीतास या वेगाकरिता तयार करण्यात आला आहे. बायपासची लांबी 14.80 कि.मी असून कामाची किंमत 421.80 कोटी इतकी आहे. या बायपासच्या मुख्य रस्त्याची रुंदी 32 मीटर असणार आहे. 3 मोठे पुल,2 फ्लॉयओव्हर, दोन्ही बाजूस 6 बस शेल्टर असतील. भंडारा बायपास मुख्य रस्त्याची रुंदी 7 मीटर व लांबी 17.46 किलोमीटर व 2 मीटर फुटपाथ ड्रेनसह असणार आहे. एक्सेस कंट्रोल ग्रीन फिल्ड बायपासची लांबी 10.34 कि.मी असणार आहे. 17 व्हेईकुलर अंडरपास असणार असून संपूर्ण बायपास व पुलावर दोन्ही बाजुस दिव्यांची व्यवस्था असणार आहे.

या बायपासमुळे भंडारा शहरात होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे. तसेच नागपूर व रायपूर या दोन प्रमुख शहरांमधील दळणवळण सोयीचे होईल. शहरातील जुन्या दोन पदरी पुलावर होणाऱ्या वाहतुकीला वळण लागणार असून वेळ व इंधनाची बचत होईल.


Back to top button
Don`t copy text!