श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयात सहजयोग साधना शिबिर संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ जुलै २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथे राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक दिवसीय सहजयोग साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योग साधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जाऊन त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते, असे शिबिरात मान्यवरांनी सांगितले.

सदरील शिबिरासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून योग मार्गदर्शक श्री. अनिल रणवरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांच्या हस्ते योग मार्गदर्शक योग शिक्षक श्री.अनिल रणवरे यांचा सन्मान करण्यात आला.

सहजयोग ही ध्यानसाधना करण्याचे तंत्र असून ती एक धार्मिक आणि साधना चळवळ आहे. निर्मला श्रीवास्तव उपाख्य श्रीमाताजी निर्मला देवी या चळवळीच्या संस्थापक-प्रनेत्या आहेत. १९७० साली त्यांनी ही चळवळ उभी केली व ती प्राचीन भारतातील योगसाधनेशी निगडीत आहे. दररोज योगा केल्याने शरीरावर होणारा सकारात्मक परिणाम, शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा कसा फायदेशीर आहे, योगा केल्याने शरीराला मिळणारी ऊर्जा, स्नायूंची वाढणारी ताकद तसेच तणाव मुक्तीसाठी योगाकडे द्यावयाचे लक्ष, दररोज स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी योगा करण्याचे महत्व या विषयवार सविस्तर मार्गदर्शन प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

योग मार्गदर्शक श्री. अनिल रणवरे यांनी शिबिरात मार्गदर्शन करताना सहजयोग ही मानवी जाणिवेत क्रांतिकारक उत्क्रांती घडवून आणणारी साधना पद्धती आहे, असे श्रीमाताजी यांनी सांगितल्याचे ते म्हणाले. श्रीमाताजी म्हणतात, प्रत्येक मानवात जागृत होऊ शकणार्‍या या जाणिवजागृतीच्या मार्गाने मानवजातीचे जागतिक ऐक्य साधले जाऊ शकते. या जागृतीने आपल्या अंतर्यामात अमुलाग्र परिवर्तन होईल. या प्रक्रियेने व्यक्ती नैतिक, समग्र, एकात्म आणि संतुलित होईल. शीतल लहरीच्या रूपात कोणत्याही व्यक्तीला विश्वव्यापक दिव्य शक्तीचा खराखुरा अनुभव येत असल्याची भावना जाणवेल. ‘स्वतःला जाणा’ ही सर्व पवित्र ग्रंथांची मुख्य विचारधारा आहे. तीच येथे सुस्पष्ट होते आणि कोणताही माणूस आत्मजाणिवेच्या परमावधीला उपलब्ध होतो. तसेच सहजयोग शिबिरात सहजयोगाचे विविध प्रकाराचे प्रात्यक्षिकासह माहिती देऊन सर्व उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक वृंद यांचेकडून सहजयोग करून घेतले.

या एकदिवसीय सहजयोग शिबिरासाठी दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. पी. तरटे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!