दैनिक स्थैर्य । दि.३० मार्च २०२२ । सातारा । कोयना धरणाच्या निर्मितीमुळे मौजे शेल्टी ता. जावली या गावातील एक कुटुंब वगळता सर्व कुटूंबे पुनर्वसनाच्या ठिकाणी वास्तव्यास गेली आहेत. सद्यस्थितीत वास्तव्यास असलेल्या मुळच्या एका कुटुंबातील 20 सदस्य शेल्टी या गावात वास्तव्य करीत आहेत. ते अद्याप पुनर्वसनाच्या ठिकाणी वास्तव्यास गेलेले नाहीत. या कुटुंबातील 7 विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्या-जाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लाँचची सेवा पूर्वीपासूनच उपलब्ध करुन देण्यात आली असून या विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी लाँचमधून प्रवास करतांना त्यांना लाईफ जॅकेट व सुरक्षेच्या दृष्टीने इतर आवश्यक साधणे उपलब्ध करुन देण्यात आली असून या विद्यार्थ्यांचे तापोळा भागातील वसतिगृहे व आश्रमशाळेमध्ये प्रवेशासाठी प्रशासन आग्रही असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांनी दिली आहे.
या कुटुंबात एकूण 11 मुले आहेत, त्यापैकी 8 मुले प्राथमिक व माध्यमिक गटातील शालेय विद्यार्थी आहेत. यातील 7 विद्यार्थ्यांना कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातून लाँचद्वारे प्रवास करुन मौजे, तळदेव ता. महाबळेश्वर व मौजे पिंपरीतांब ता. महाबळेश्वर येथे शिक्षणासाठी जावे लागते तर 1 विद्यार्थी मौजे वलवण येथे वास्तव्यास राहत असून तो त्याच गावातील जि.प. शाळेत शिक्षण घेत आहे.
या विद्यार्थ्यांना शाळेसाठीचा रोजचा लाँचमधील प्रवास टाळण्यासाठी तापोळा भागातील वसतिगृहे किंवा आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांच्या पालकांना प्रशासन प्रवृत्त करत आहे. पालक सहमत झाल्यास या विद्यार्थ्यांचे प्रवेश वसतिगृह किंवा आश्रमशाळा येथे घेण्यात येतील. यामुळे विद्यार्थ्यांची निवासाची व शिक्षणाची सोय एकाच ठिकाणी होईल. तसेच या कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरुपी पुनर्वसन झालेल्या ठिकाणी वास्तव्यास जाण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असल्याचेही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांनी कळविले आहे.