स्थैर्य, जयपूर, दि. १४ : राजस्थानमध्ये बंडाचे निशाण फडकवून आपल्याच सरकारला आव्हान देणारे सचिन पायलट यांच्याबद्दल काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आले आहे.
काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सूरजेवाला यांनी हा निर्णय जाहीर केला. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्षपदावरुनही हटवण्यात आले आहे. पायलट यांच्यासह त्यांच्या गोटात असणाऱ्या दोन मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.
आज जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची दुसरी बैठक झाली. या बैठकीला सचिन पायलट अनुपस्थित होते. त्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते. तरीही ते अनुपस्थित राहिले. त्यानंतर आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर रणदीप सूरजेवाला यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याचा निर्णय जाहीर केला.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या १०२ आमदारांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी केली. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
सचिन पायलट यांनी त्यांना २५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. २०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे १०७, भाजपाचे ७२ आमदार आहेत. त्याशिवाय १३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा अशोक गेहलोत यांचा दावा आहे.
राजस्थानात २०१८ मध्ये काँग्रेस सत्तेवर आली, तेव्हापासूनच सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोन नेत्यांमध्ये स्पर्धा, संघर्ष सुरु झाला. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांच्याजागी अशोक गेहलोत यांच्या नावाची घोषणा केली, तेव्हाच सत्ता संघर्षाची बीजं रोवली गेली. काँग्रेस राजस्थानात सत्तेवर आली, तेव्हा सचिन पायलट प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख होते. प्रदेशाध्यक्ष या नात्याने राजस्थानात काँग्रेसला सत्तेवर आणण्यात आपला प्रमुख वाटा आहे, असे त्यांचे म्हणणे होते.