दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२४ | फलटण | फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या वतीने फलटणची जागाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सचिन सुधाकर पाटील हे अधिकृत उमेदवार असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी असलेले व भारतीय जनता पार्टीचे फलटण – कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन सुधाकर पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
गतकाही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दीपक चव्हाण यांनी आपला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून सचिन सुधाकर पाटील यांचे नाव जाहीर झाल्याने आगामी निवडणुकीमध्ये तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आगामी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची मानली असून याबाबत लोकसभा निवडणूक झाल्यापासून ते तयारीला लागलेले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करून सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संपूर्ण फलटण तालुका पिंजून काढत विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचाच उमेदवार फलटण विधानसभेवर निवडून जाण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली आहे.