दैनिक स्थैर्य | दि. २३ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांना धक्का देत हॅट्रीक आमदार दीपक चव्हाण यांचा २६ पैकी २५ फेरीमध्ये तब्बल १८ हजार मतांची आघाडी घेत सचिन पाटील जायंट किलर ठरले आहेत. सचिन पाटील यांचा विजय प्रस्थापित राजे गटाच्या सलग 30 वर्षाच्या सत्तेला छेद देणारा असल्याने राज्यभरात या निकालाची चर्चा होत आहे.
26 फेऱ्यांपैकी २५ फेरींमध्ये सचिन पाटील यांना आघाडी घेत सचिन पाटील हे जायंट किलर ठरले आहेत.
निवडणूक पार्श्वभूमी
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघात यंदा एकूण 14 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असताना प्रामुख्याने राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत पहायला मिळाली. निवडणूकीच्या तोंडावर आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर वगळता संपूर्ण राजे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेला होता. त्यामुळे विद्यमान आमदार या निवडणूकीत महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. तर दुसरीकडे महायुतीतून फलटणची जागा भारतीय जनता पक्षाला न मिळाल्याने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात सचिन पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून आपले नशिब आजमावत होते. आजवर पाण्याच्या प्रश्नावर गाजणारी फलटणची विधानसभा निवडणूक यंदा मात्र पाण्यासह अन्य विकासात्मक मुद्यांवर गाजली होती. ना.अजित पवार, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह महायुतीतील प्रचार प्रमुखांनी फलटणशी तुलना बारामतीशी करुन मतदारांचे मत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मोठे यश आल्याचे या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.
दोन दादांच्या ताकदीने राजे गटाच्या सत्तेला सुरुंग
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व माढ्याचे माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर या दोन्ही दादांनी सचिन पाटील यांच्या एकत्रित ताकदीने राजे गटाच्या सलग 30 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. प्रचाराच्या धामधुमीत अजितदादा पवार यांनी फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघात तब्बल तीन जाहीर सभा घेतल्या होत्या. या सभांमधून त्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कारभारावर बोट ठेवत बारामतीशी तुलना केली होती. सचिन पाटील यांना विजयी करा; मी तालुक्याचा विकास करुन दाखवतो असे अभिवचन त्यांनी फलटणकरांना दिल्याने दादांच्या विकासाच्या वाद्याकडे बघून फलटणकरांनी सचिन पाटील यांना मतदान केले असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघात गावोगावी कोपरा सभांद्वारे खासदारकीच्या काळात केलेली विकासकामे लोकांसमोर ठेवली होती. शिवाय प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, माणिकराव सोनवलकर, विलासराव नलवडे, विक्रम भोसले, सागर अभंग अशा ज्येष्ठ आणि युवा नेत्यांची मोट बांधून तालुक्यात प्रचाराचा झंझावात निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते. अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांनीही फलटण शहरासह तालुक्यातील अनेक गावांमधून रणजितदादांची भूमिका आणि त्यांनी केलेली कामे लोकांपर्यंत पोचवली होती.
लाडक्या बहिणींचे सचिन पाटील यांना आशीर्वाद
राज्यभरात वाढलेला मतदानाचा टक्का आणि महायुतीच्या उमेदवारांना पडलेली भरघोस मते याचे कारण लाडकी बहिण योजना मानले जात असताना फलटणमध्येही लाडक्या बहिणींचेच आशिर्वाद सचिन पाटील यांना मिळाले असल्याचे दिसून येत आहे.
राजे गटाचे अनेक कार्यकर्ते यापूर्वी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटात गेले होते. राजे गटात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत कलह असल्याचे चित्र यामधून दिसून येत आहे. याच अंतर्गत कलहाचा परिणाम दिपक चव्हाण यांच्या पराभवामागे असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, या धक्कादायक निकालामुळे राजे गटाच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असून फलटण तालुक्यात राजकारणाचा नवा अध्याय सुरु झाला असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.