फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले – पाटील यांची नुकतीच राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या फलटण येथील कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला आहे; सातारा जिल्हा ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांनी….
फलटण तालुक्यात अनेक उपविभागीय अधिकारी आले, त्यामध्ये काही मोजकेच अधिकारी सोडले तर इतर अधिकाऱ्यांनी तालुक्याचे लचके तोडण्यापेक्षा कोणतेही ठोस कार्य केले नाही. मात्र, सचिन ढोले – पाटील यांचा कार्यकाळ हा या सर्वात वेगळा राहिला. त्यांनी फलटणच्या उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, त्यांनी तालुक्याला आपले समजून काम करण्याची सुरुवात केली आणि अनेक दिवस रेंगाळलेली कामे मार्गी लावली.
सचिन ढोले – पाटील यांनी त्यांच्या १.५ वर्षाच्या कार्यकाळात फलटण तालुक्यात अनेक महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली. त्यांनी सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत काम करीत असताना दिसून आले. शनिवारी सुट्टीच्या दिवशी देखील त्यांच्या कार्यालयामध्ये अनेक लोकांचे प्रश्न सोडवीत असताना ते दिसून येत असत. प्रत्येक व्यक्तीच्या अडी-अडचणी व प्रश्न व्यवस्थित ऐकून घेऊन त्याचे काम होत असेल तर लगेच मार्गी लावताना दिसून आले.
त्यांनी फलटण ते बारामती रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण, फलटण ते बारामती रस्ता ज्यावर अनेक दिवस जमीन अधिग्रहणावरून रखडलेला होता, यासारखे जटील प्रश्न मार्गी लावले. सोमंथळी येथील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मार्गी लावला. पंतप्रधान आवास योजनेमध्ये काही लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नव्हती, अशा अनेक लाभार्थ्यांना त्यांनी तात्काळ जमिनी उपलब्ध करून देऊन त्यांच्या घर बांधणीचा प्रश्न मार्गी लावला.
लोकसभा व विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी त्यांनी निवडणुकीची संपूर्ण तयारी करीत असताना, निवडणुकीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग व त्या कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी समजावून घेणे व त्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात ते अग्रेसर होते. निवडणूक प्रशिक्षण काळात व मतदान काळात चहा, नास्ता व जेवण व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रत्येक कर्मचाऱ्याला लेमन गोळीचे एक पॉकेट उपलब्ध करून दिले होते, ज्यामुळे शुगरच्या समस्या होणार नाहीत.
सचिन ढोले – पाटील यांच्यामध्ये अभ्यासू वृत्ती प्रकर्षाने दिसून आली. माहीत नसणाऱ्या गोष्टींची माहिती घेऊन अभ्यास करून प्रत्येक प्रश्नाची उकल करण्यामध्ये ते माहीर असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आपल्या मुख्य कार्यालयामध्ये ओ.एस.डी. पदावर नियुक्ती दिली आहे.
सचिन ढोले – पाटील यांनी केलेल्या प्रामाणिक सेवेमुळे ते सदैव फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या स्मरणात राहतील. जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते सचिन ढोले यांचा अनेक वेळा सन्मान चिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला होता. भविष्यातही फलटण तालुक्यासाठी सचिन ढोले यांच्यासारखा कार्यक्षम, कार्यमग्न, मनमिळावू, अभ्यासू व होतकरू अधिकारी मिळावा ही अपेक्षा आहे.