दैनिक स्थैर्य | दि. ६ डिसेंबर २०२४ | फलटण |
संपूर्ण देशामध्ये जागतिक ‘मृदा दिन’ म्हणून ५ डिसेंबर साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सासकल येथे जागतिक ‘मृदा दिन’ आयोजित केला होता. यावेळी जमिनीच्या आरोग्यपत्रिकेचे शेतकर्यांना फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी तंत्र अधिकारी सुवास रणसिंग, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मंडल कृषी अधिकारी विडणी शहाजी शिंदे, मनोज पवार सर, कृषी पर्यवेक्षक अजित सोनवलकर, कृषी सहाय्यक सचिन जाधव तसेच सासकल पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास जमिनीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार असून विषमुक्त शेतमाल तयार करण्यासाठी यावेळी शेतकर्यांना सचिन ढोले यांनी आवाहन केले.
शेतकरी बबन रामचंद्र मुळीक यांच्या सीताफळ तोडणीचा शुभारंभ सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आला. बबन मुळीक यांनी विविध सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या निविष्ठा व फळबागा लागवड प्रक्षेत्रास भेट देऊन ढोले यांनी त्यांचे कौतुक केले.
तंत्र अधिकारी सुहास रणसिंग यांनी नैसर्गिक शेती गट योजनेमध्ये शेतकर्यांनी सहभागी होऊन सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीमाल उत्पादित करणेबाबत शेतकर्यांना आवाहन केले.
जमिनीची वाढती धूप तसेच बेसुमार रासायनिक खतांचा वापर यामुळे जमिनीची सुपिकता कमी झाल्यामुळे पिकांचे उत्पादनही कमी होत चालले आहे, पुढच्या पिढीला सुपीक जमीन देण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी जमीन सुपीक असणे आवश्यक आहे. त्यामुळे माती परीक्षणाचे महत्त्व व माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर करणे रासायनिक खतांवरील खर्च कमी करून योग्य खतांची मात्रा दिल्यामुळे पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याबाबत माहिती यावेळी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवर व शेतकर्यांनी जागतिक मृदा दिनाची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी मोहन मुळीक, मनोहर मुळीक, ज्ञानदेव मुळीक, मुरलीधर मुळीक, संजय चांगण, विकास मुळीक, सत्यवान मुळीक, संपत मुळीक, भीमराव घोरपडे तसेच मोठ्या प्रमाणात सासकल व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.