
स्थैर्य, सातारा, दि. 27 सप्टेंबर : केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्यांना उच्च प्रतीचे बियाणे आणि खते उपलब्ध व्हावीत. बियाणे आणि खतांच्या वितरणामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी महत्त्वाकांक्षी साथी पोर्टल लॉन्च केले आहे. कोरेगाव तालुक्यामध्ये या पोर्टलद्वारे काम करण्याचा एकमुखी प्रशिक्षण वर्गात निर्धार करण्यात आला आहे. कृषी विभागातर्फे आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गास शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव यांच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातील कृषी निविष्ठाधारकांना प्रशिक्षण देण्यात आले. कोरेगाव कृषी मापदा संघटनेचे अध्यक्ष अनिल ढोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
विभागीय तंत्र अधिकारी प्रल्हाद साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक संजय फडतरे यांनी साथी पोर्टलबाबत अत्यंत सविस्तर माहिती दिली. निविष्ठाधारकांच्या अडीअडचणींबाबत मार्गदर्शन केले. कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी साथी पोर्टलच्या पॉस मशीनबाबत वापरताना विक्रेत्यांना येणार्या अडीअडचणीबाबत मार्गदर्शन केले.
ज्ञानदेव जाधव यांनी विक्रेत्यांना मोबाईलवर महाकृषी अॅप वापराबाबत मार्गदर्शन केले. शेतकर्यांनी निविष्ठा खरेदी करत असताना ग्री स्टॅक आयडीचा वापर करावा. शेतकर्यांना ग्री स्टॅक आयडी अशाप्रकारे काढावा याबाबत मार्गदर्शन केले. महा कृषी विस्तार अॅपचा प्रचार आणि प्रसार कशाप्रकारे करावे याची माहिती सांगितली. गुणनियंत्रण विभागाचे कृषी अधिकारी सचिन लोंढे यांनी सर्व प्रकारच्या नोंदवही आणि तपासणी बाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कृषी अधिकारी गणपत गायकवाड, महेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.