स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) फलटण आगारातून दररोज फलटण व बाहेरील आगाराच्या शेकडो फेऱ्याद्वारे हजारो प्रवाशांची वाहतूक करुन फलटण आगाराला लक्षावधी रुपयांचे उत्पन्न मिळवून देण्यासाठी फलटण आगाराच्या १०० आणि बाहेरील आगाराच्या जवळपास तेवढ्याच बसेस नियमीत धावत असत मात्र करोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे सारे ठप्प झाल्याने एस. टी. तोटा सतत वाढत असताना कामगारांच्या नोकऱ्या असुरक्षिततेच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
सुमारे २५० वाहक, २०० चालक, वर्कशॉप मधील कर्मचारी आणि सर्व अधिकारी असा सुमारे ५००/५५० अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दररोज सुमारे १० हजारावर प्रवाशांची ने-आण करणाऱ्या, ज्यामध्ये ग्रामीण भागातून फलटणला दररोज येणाऱ्या सुमारे २५०० ते ३००० विद्यार्थी/विद्यार्थिनींचा समावेश आहे. फलटण आगाराचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे.
सध्या केवळ फलटण-सातारा मार्गावर प्रवासी वाहतूक सुरु असून वैभववाडी, चिपळूण, लातूर, पुणे या मार्गावर माल वाहतुकीचे मर्यादित काम सुरु असून उर्वरित एस. टी. बसेस जागेवर उभ्या आहेत तर चालक/वाहकांना कोणतीही ड्युटी दिली जात नसल्याने त्यांच्यावर घरी किंवा आगारात बसून राहण्याची वेळ आली आहे.
सध्या फलटण-सातारा मार्गावर दररोज सकाळी ६, ८.१५, १०.४५ दुपारी १३.३०, १५.३० आणि सायंकाळी ६ तर सातारा-फलटण मार्गावर सकाळी ८ दुपारी १५.१५ आणि सायंकाळी १७.४५ अशा मर्यादित फेऱ्या सुरु आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद, जिल्हा बँक, जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य ठिकाणी नोकरीस असलेले कर्मचारी व व्यावसाईक यांची सोय झाली आहे.
दरम्यान एस. टी. रोजंदारीवरील कामगारांची सेवा तूर्त स्थगित करण्याच्या महामंडळाच्या निर्णयाचा फटका फलटण आगारातील १० चालकांना बसला आहे तर नियमीत अधिकारी/कर्मचाऱ्यांना मार्च पेड एप्रिलमध्ये ७५ %, एप्रील पेड मे मध्ये १०० % आणि मे पेड जून मध्ये ५० % पगार देण्यात आला असून जून पेडजुलै मध्ये मिळणारे पगार अद्याप झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. एस. टी. सोसायटी, गृहबांधणी, घरगुती वस्तू खरेदी यासाठी घेतलेल्या कर्जाची ५०% किंवा त्याहून अधिक कटती पगारातून होत असल्याने ५०% पगार मिळाला त्यावेळी अनेकांच्या हातात काहीच आले नाही पगार नसल्याने सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. लवकरात लवकर पगार व्हावेत अशी सर्व अधिकारी/कर्मचारी यांची मागणी आहे, त्यापेक्षा करोना प्रादुर्भाव कमी होऊन प्रवासी वाहतूक नियमीत सुरु झाली पाहिजे अन्यथा आज रोजंदारी कामगारांना बसलेला फटका सर्वांना बसू शकतो याची जाणीव झाल्याने दररोज सर्वांची परमेश्वराकडे हे सर्व लवकर सुरळीत होण्यासाठी प्रार्थना सुरु असल्याचे बस स्थानकावर भेटलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी आवर्जून सांगितले.