दैनिक स्थैर्य । दि. १७ डिसेंबर २०२१ । गोखळी । फलटण एस. टी. आगारातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून फलटण – आसू – गोखळी – बारामती रस्त्यावर गोखळी पाटी येथे “जागर एसटीचा” हे पथनाट्य सादर करण्यात आले. विशेषतः विद्यार्थी व नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.
एस. टी. चे शासनात विलगीकरण झाल्यास जनतेचे फायदे आणि एस.टी.चे खाजगीकरण झाल्यास जनतेचे होणारे नुकसान एस. टी. कर्मचाऱ्यांनी गोखळी पाटी येथे सादर करण्यात आलेल्या पथनाट्याद्वारे समाज प्रबोधन करुन विद्यार्थी व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
दि. २८ ऑक्टोबर पासून सुरु असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थी, नागरिक यांची मोठी गैरसोय झाली आहे, हे मान्य करुन कर्मचाऱ्यांनी आपल्याला एस. टी. महामंडळाकडून मिळणाऱ्या कमी वेतनामुळे कुटुंबाची होणारी व्यथा, वेदना पथनाट्यातून सादर करुन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
“जागर एसटीचा” हे पथनाट्य संपूर्ण तालुकाभर गावोगावी जाऊन कर्मचारी सादर करणार आहेत. एस.टी. कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलगीकरण होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहील असे कर्मचाऱ्यांनी ठामपणे सांगितले. गोखळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच डॉ. अमित गावडे यांनी फलटण एस. टी. आगारातील कर्मचाऱ्यांचे स्वागत करुन एस. टी. कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण करावे यास पाठिंबा व्यक्त करुन ग्रामपंचायत ठराव देण्यात येईल असे सांगितले. यावेळी तिरंगा फाऊंडेशनचे सर्वेसर्वा रणजित शिंदे यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन शासनाने कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी केली.