दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत टंचाई आढावा घेण्यात आला. यावेळी आ. दिपक चव्हाण यांनी एस. टी. महामंडळाच्या फलटण आगारात बसेसची टंचाई असून येथे किमान ३० बसेस उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी केली.
या आढावा बैठकीस सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नायब तहसीलदार तुषार देशमुख, महसूल नायब तहसीलदार एन. डी. काळे, निवासी नायब तहसीलदार डॉ. सौ. डी. एस. बोबडे – सावंत, संजय गांधी योजना नायब तहसीलदार डॉ. भक्ती सरवदे, निवडणूक नायब तहसीलदार शबाना बागवान उपस्थित होत्या.
दरम्यान, या बैठकीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) फलटण आगार व्यवस्थापिका श्रीमती वासंती जगदाळे व त्यांचे सहकारी अधिकारी उपस्थित होते. त्यांनी त्यांच्याकडील एस. टी. बसेस टंचाईचा अहवाल सादर करताना या आगारात पूर्वी ११० एस. टी. बसेस होत्या, ती संख्या आता ६५ वर आल्याने प्रवाशांना सेवा देण्यात मोठी अडचण येत असल्याचे निदर्शनास आणून देत फलटण आगारासाठी साध्या दरातील लाल रंगाच्या किमान ३० बसेस तातडीने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले.
महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थी प्रवाशांची संख्या मोठी
ग्रामीण भागातून शिक्षणासाठी फलटण येथे येणार्या विद्यार्थी/विद्यार्थिनींची संख्या सुमारे ५ हजारांवर असून त्याचबरोबर महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के आणि ७५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत असल्याने प्रामुख्याने ग्रामीण भागातील या प्रवाशांची संख्या मोठी असून फलटण आगाराने तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्व बस फेर्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी सूचना आ. दिपकराव चव्हाण यांनी केली. मात्र, पुरेशा बसेस अभावी ते लगेच शक्य नसल्याचे निदर्शनास आणून देत आपण फलटण – बोरिवली मार्गावरील लांब पल्ल्याच्या बस फेर्या कमी करून ग्रामीण भागात फेर्या वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे आगार व्यवस्थापिका श्रीमती वासंती जगदाळे यांनी सांगितले.