दैनिक स्थैर्य | दि. १८ जानेवारी २०२५ | फलटण |
राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसेस सध्याच्या धावपळीच्या युगात सार्वजनिक सुरक्षित प्रवासाचे साधन म्हणून प्रसिद्ध आहेत. एस. टी. बसचा चालक आपले वाहन सुरक्षितपणे चालवून प्रवाशांना सुरक्षित सेवा देत असतो. एस. टी. महामंडळाचे ‘सुरक्षित सेवा’ हे ब्रीद असून एस.टी.च्या सर्वच कर्मचार्यांनी प्रवाशांना आणखीन सुरक्षित सेवा दिली पाहिजे, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. शंभूराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
एस. टी. महामंडळाच्या सुरक्षितता मोहीम कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शंभूराजे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे होते. यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रभारी स्थानकप्रमुख सुहास कोरडे यांनी प्रास्ताविकात एस. टी. महामंडळाच्या सुरक्षितता मोहिमेविषयी माहिती देऊन ११ जानेवारी ते २५ जानेवारीअखेर सुरक्षितता मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगितले.
प्रा. शिवलाल गावडे यांनी फलटण आगार नेहमीच सुरक्षिततेसाठी आघाडीवर असल्याचे नमूद करून महामंडळाच्या सुरक्षितता मोहिमेस शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल वाघमोडे यांनी अध्यक्षीय भाषण करताना एस.टी. महामंडळात कायमच सुरक्षितता राखली जाते, प्रवाशांच्या सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले जाते, असे नमूद करून चालक- वाहक व कार्यशाळा कर्मचारी यांनी सुरक्षितता नियमांचे काटेकोरपणे पालन करून ‘एस.टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास’ हे महामंडळाचे ब्रीद सार्थ करावे, असे आवाहन केले.
यावेळी वाहतूक निरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी, प्रशिक्षणार्थी वाहतूक निरीक्षक आशुतोष चव्हाण, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे, वरिष्ठ लिपिक कुलदीप चव्हाण, लहू चोरमले, चालक- वाहक व बहुसंख्य कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.