दैनिक स्थैर्य । दि. २९ सप्टेंबर २०२२ । सातारा । रयत शिक्षण संस्था हे महाराष्ट्राचे वैभव असून रयतेने अनेक रत्न घडवून समाजाला दिशा दिली. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई ऊर्फ वहिनी यांच्या त्यागातून रयत शिक्षण क्षेत्रात दिपस्तंभासारखी दिशादर्शकाची भूमिका बजावत आहे.बहुजनांच्या लेकरांना सर्व स्तरावरील उचित शिक्षण मिळावे म्हणून संस्था माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अग्रस्थानी राहून कार्यरत आहे. त्यामुळेच रयत शिक्षण संस्थेला विद्यापीठाचा दर्जा बहाल झाला आहे.रयत विद्यापीठ हा कर्मवीर आण्णांचा गौरव आहे असे मत रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल रुई तालुका कोरेगाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी मांडले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य संपत वीर होते तसेच पीरुभाई मुलाणी, अर्जुन वीर, मुख्याध्यापक हितेंद्र घाडगे, उपसरपंच रमेश कुंभार, सतीश वीर, तानाजी साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की,कर्मवीर अण्णांनी माणसे जोडून समाज जागृती केली व समाज परिवर्तन घडवून आणले. आयुष्याचा प्रत्येक क्षण बहुजन समाजातील लेकरांच्या शिक्षणासाठी वेचला त्याचमुळे महाराष्ट्र घडला. रयतेचा वटवृक्ष आज गगनाला गवसणी घालत आहे.शासनाच्या पुढे एक पाऊल टाकून रयत सर्वानाच दिशादर्शक ठरत आहे.
यावेळी स्कूल कमिटी सदस्य पीरुभाई मुलाणी, सतीश वीर, तानाजी साळुंखे, उपशिक्षक पुरुषोत्तम धापड, श्रावणी अनभुले, अनुष्का मोरे यांनी मनोगते व्यक्त केली. सुरुवातीला कर्मवीर आण्णा व लक्ष्मीबाई ऊर्फ वहिनी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून रांगोळी प्रदर्शन दालनाचे उद्घाटन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळवलेले स्पर्धक यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून विद्यालयाच्या ग्रंथालयास ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी विद्यार्थी व शिक्षण यांच्यासाठी संस्कार शिदोरी ही सहा पुस्तके मोफत भेट दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक हितेंद्र घाडगे यांनी केले, महेश नजन यांनी स्पर्धा बक्षीस वितरण व शाखा इतिहास याचे वाचन केले, श्रीमती स्वाती भिलारे यांनी सूत्रसंचालन केले तर एम. एन. टोनपे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ दीपाली करपे, हर्षल लवंगे, प्रताप ठोंबरे, राजेश गायकवाड, भरत वाघ, शिवाजी धुमाळ यांनी परिश्रम घेतले. यावेळी रुई पंचक्रोशीतील रयतप्रेमी हितचिंतक, ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.