स्थैर्य, दि. १७ : रशियात झालेली कोरोनावरील लस स्पुटनिक-व्ही लवकरच भारताला मिळणार आहे. भारतीय कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला लसीचे 10 कोटी डोस विकण्याची तयारी रशियन सोव्हेरजियन वेल्थ फंडने दर्शवली आहे. स्पुटनिक-व्ही लस परदेशी पाठवण्याची तयारी रशियाने सुरू केली आहे.
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) भारतीय कंपन्यांसोबत कोरोनावरील लसीचे 30 कोटी डोस तयार करण्याचा करार केला आहे. या 30 कोटी डोसची निर्मिती भारतात केली जाईल. भारतातील अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक असलेली डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज स्पुटनिक-व्ही लसीच्या तिसर्या टप्प्यातल्या चाचण्या भारतात घेणार असल्याची माहिती आरडीआयएफने दिली आहे.
भारतात लसीच्या तिसर्या टप्प्यातल्या चाचण्या झाल्यानंतर नियामक संस्थेकडे तिची नोंदणी करण्यात येईल. यानंतर चालू वर्षाच्या अखेरीस भारतात स्पुटनिक-व्ही लस निर्यात केली जाईल. कोरोनावरील लसीची नोंदणी करणारा रशिया हा जगातला पहिला देश आहे. तिसर्या टप्प्यातल्या चाचण्या व्यापक प्रमाणात पूर्ण होण्याआधीच रशियाने लसीची नोंदणी केली. त्यामुळे डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी लसीच्या कार्यक्षमता आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्पुटनिक-व्ही लसीचे पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक होते, अशी माहिती जी. व्ही. प्रसाद यांनी दिली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्पुटनिक व्ही विश्वासार्ह पर्याय असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या लसीची किंमत नेमकी किती असेल, याची माहिती आरडीआयएफने दिलेली नाही. मात्र कोरोना लसीच्या विक्रीतून आम्हाला नफा कमवायचा नाही. निर्मितीसाठी आलेला खर्च वसूल होईल, इतकाच विचार करून लसीची किंमत ठरवण्यात येईल, असे आरडीआयएफने याआधी म्हटले होते. त्यामुळे लसीची किंमत जास्त नसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येनं कालच 50 लाखांचा आकडा ओलांडला. दर दिवशी देशात 90 हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर अतिशय मोठा ताण आला आहे. सध्याच्या घडीला ऑक्सिजन पुरवठ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी बेड्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे कोरोना लस नेमकी कधी उपलब्ध होणार, याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.