आज अचानक एक अनपेक्षित बातमी कानावर आली ती म्हणजे सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक कै. सुहास नागनाथ वीरकर यांचे निधन, आणि सर्व इतिहास डोळ्यासमोर उलगडला.
सुहास आणि मी जवळजवळ राहणारे, तो खेमका भुवन, फणसवाडी येथे तर मी कोळीवाडी, फणसवाडी, गिरगाव मध्ये रहाणारा. आमच्या दोघात 3 वर्षाचे अंतर. त्याचे काका कै श्रीधरपंत वीरकर, आमच्याच मजल्यावर रहायचे त्यामुळे तो आमच्या मजल्यावर नेहमी यायचा. त्याला लौकिक शिक्षणात गोडी नव्हती त्यामुळे त्यांनी त्यात एवढे लक्ष घातले नाही. पुढे एसएससी पास झाल्यावर त्याने नाटक या विषयात लक्ष घालायला सुरवात केली. त्याचे काका कै श्रीधरपंत सुद्धा नाट्यकलाकार होते, त्यामुळे घरात नाटकाची आवड होती. शिक्षणानिमित 8 वि पर्यन्त डोंबिवली येथे शाळेत असताना त्यांनी केलेल्या नाट्य भूमिका गाजल्या होत्या.
त्यावेळी प्रसिद्ध नाट्यकर्मी कै. अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे यांच्या प्रायोगिक नाटकांच्या तलिमा छबिलदास हायस्कूल मध्ये होत होत्या. त्या बघायला मिळाव्यात म्हणून या बेट्याने दादर स्टेशन जवळील दाते झेरॉक्स मध्ये नोकरी पकडली. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर सुहासचा पत्ता छबिलदास झाला. त्यावेळी त्या तालीमा बघायला मी त्याच्याबरोबर कधीकधी जात असे. रोहिणी हट्टंगडी, नाना पाटेकर, जयदेव हट्टंगडी, सुलभा देशपांडे सारख्या पुढे नावारूपाला आलेल्या सर्व कलाकारांचा तेथे वावर असायचा. त्याची नाटकावरील अमाप श्रद्धा बघून त्याला देशपांड्याच्या इंडियन नॅशनल थिएटरने ब्याक स्टेज सांभाळायची जबाबदारी दिली ती त्याने अतिशय उत्तम पार पाडली. त्यांनतर प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा, तसेच आणखी काही कला मंचांमध्ये त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. हे सर्व करीत असताना लायटिंग, म्युसिक, प्रॉपर्टी, नेपथ्य या विषयात त्याचे अनौपचारिक शिक्षण सुरूच होते. दिवसाची रात्र करून त्याने आपले स्थान या मंडळीत मिळवले. पुढे त्याची ही धडपड बघून त्याला एक कायमस्वरूपी उपजीविकेचे साधन मिळावे म्हणून आय. एन. टी. च्या बापू लिमये यांनी त्याला रेल्वेच्या कला विभागात विशेष कर्मी म्हणून स्थान मिळवून दिले. दुपारी एक वाजेपर्यंत ऑफिसचे काम आणि त्यानंतर रेल्वेची विविध डिपार्टमेंट मधील नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम अशी जबाबदारी त्यांनी रिटायर होईपर्यंत पार पाडली. या मध्ये त्यांनी नाट्य दिग्दर्शनापासून सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. जयदेव हट्टंगडी, सत्यदेव दुबे या सारख्या उत्तम दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यामुळे नाटकाची सर्वतोपरी समज आणि दिग्दर्शक म्हणून लागणारे गुण त्यांनी अंगात बाणवले आणि जोपासले. हे करत असताना अनेक सामाजिक संस्था, नाट्यमंडळी, त्यांची वार्षिक नाटके, स्पर्धांची नाटके, एकांकिका स्पर्धा या ठिकाणी त्याला लोक दिग्दर्शक म्हणून बोलावून त्याचे मार्गदर्शन घेत. तो अतिशय अल्प किंवा शून्य मोबदल्यात काम करे. पैसा हे सर्वस्व त्याने कधीच मानले नाही. या सर्वांच्या नाटकांना, त्यातील पात्रांना, आणि वैयक्तिक दिग्दर्शक म्हणून शेकडो बक्षिसे मिळाली आहेत. साहित्य संघ, शिवाजी मंदिर, किंवा अन्य नाट्यथिएटर मध्ये एखादे नवीन नाटक, एकांकिका स्पर्धा आहेत आणि सुहास तेथे नाही असे कधीच झाले नाही. पुढेपुढे राज्य नाट्य स्पर्धेत परीक्षक म्हणून त्याला बोलवायला सुरवात झाली आणि गेल्या दोन तीन वर्षात एक उच्चदर्जाचा परीक्षक म्हणून त्याने नाव कमावले. त्याने आज पर्यंत ८०० चे वर वेळा दिग्दर्शक म्हणून काम बघितले आहे.
एखादा माणूस ध्येयवेडा असेल तर तो आपली कशी उन्नती करून घेतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. हे सर्व करीत असताना, आमच्या वीर येथील “श्री लक्ष्मी मल्लमर्दन प्रासादिक मंडळ” या संस्थेचे खजिनदारपद सुद्धा गेले 15 वर्ष तो सांभाळत होता.
आज, 23 जून 2020, पहाटे 5 वाजता या माझ्या मित्राचे अल्पशा आजाराने वयाच्या 68 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्याचे पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, बहीण, भावंडे आहेत.
माधव भोळे