
स्थैर्य, फलटण, दि. १६ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आज महायुतीच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (खासदार गट) च्या बहुतांश उमेदवारांनी आज दुपारी फलटण नगरपालिकेच्या सभागृहात दाखल होत आपले उमेदवारी अर्ज सादर केले. अर्ज भरण्याची मुदत जवळ आल्याने पालिका आवारात राजकीय लगबग पाहायला मिळाली.
दुपारी ३ वाजता उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम वेळ निश्चित करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, दुपारी ३ वाजण्यापूर्वी जे उमेदवार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात किंवा सभागृहात उपस्थित असतात, त्यांचे अर्ज स्वीकारण्याची तरतूद आहे. या नियमाचे पालन करत ३ वाजण्यापूर्वीच महायुतीच्या इच्छुक उमेदवारांना आणि त्यांच्या सूचकांना सभागृहात प्रवेश देण्यात आला.
ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या नियंत्रणाखाली पार पडत आहे. अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही अत्यंत काटेकोरपणे सुरू असून, सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येक उमेदवाराचा अर्ज स्वीकारून त्याची पोच देण्याचे कामकाज प्रशासनाकडून केले जात आहे.
या प्रक्रियेत प्रांताधिकारी आंबेकर यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव आणि मुख्याधिकारी निखील जाधव हे सहकार्य करत आहेत. प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून उमेदवारांची कागदपत्रे तपासणे आणि अर्ज स्वीकारणे ही प्रक्रिया वेगाने आणि सुरळीत पार पाडली जात आहे.
महायुतीकडून आज शक्तीप्रदर्शन करण्यापेक्षा वेळेत तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील गटाचे उमेदवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. उमेदवारांच्या चेहऱ्यावर निवडणुकीचा उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येत होता.
दुपारी ३ वाजता नगरपालिकेच्या सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले असून, तोपर्यंत आत प्रवेश केलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने केलेल्या चोख नियोजनामुळे कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नाही.
महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. अर्ज छाननी आणि माघारीची मुदत संपल्यानंतरच निवडणुकीच्या रिंगणात नक्की कोण कोणाविरुद्ध उभे राहणार, हे अंतिम होणार आहे. तोपर्यंत पालिका आवारात आणि शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

