
दैनिक स्थैर्य । 27 जून 2025 । सातारा । आजच्या आधुनिक युगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तिचा वापर काळाची गरज आहे. या अभ्यासाच्या प्रसार व प्रचारासाठी रयत शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला, याचा आनंद आहे. कृषी क्षेत्राचे उत्पादन ’एआय’च्या माध्यमातून वाढवणे शक्य आहे, त्याचबरोबर शिक्षण तंत्रज्ञान आणि सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यापुढे महत्त्वाचा ठरणार आहे, असे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ’एआय’ अभ्यासक्रमाचा शुभारंभ आणि सेंटर ऑफ एक्सलन्स केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य प्रतापराव पवार, आमदार शशिकांत शिंदे, फिनोलेक्स ग्रुपचे रमेश ललवाणी, रयत विद्यापीठाचे कुलपती डॉ. ज्ञानदेव मस्के, प्राचार्य डॉ. ए. सी. अत्तार, प्रा. सुनील चवरे, सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे व कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, देशाच्या वाढत्या लोकसंख्येचा ताण कृषी क्षेत्रावर पडत आहे. 1947 ते 1990 या दरम्यान प्रतिमाणशी पाच एकर जमीन उपलब्ध होती. मात्र, आता प्रतिमाणशी एक एकर जमीन उपलब्ध आहे. तंत्रज्ञान वेगाने वाढते. मात्र, जमीन वाढत नाही. त्यामुळे 55 टक्के कृषी क्षेत्राचे प्रमाण आता घटत चालले असून, त्यासाठी अर्थव्यवस्थेला नवीन पर्याय शोधावे लागतील. बारामतीत ऊसाच्या उत्पादनासाठी ’एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, त्याची यशस्विता पाहून, सर्वच पिकांच्या उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा विचार आहे. भारताच्या कृषी क्षेत्राचे समस्यांवर उपाय शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान सहाय्यभूत ठरणार आहे. संस्थेच्या सर्वच शाळांमधून हा अभ्यासक्रम शिकवला जाणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेच्या सर्व शाखांमध्ये हा अभ्यासक्रम तीन टप्प्यांमध्ये अनिवार्य केल्या जाणार आहे, असे चंद्रकांत दळवी यांनी सांगितले. ’एआय’मुळे भविष्यातील तंत्रस्नेही विद्यार्थी घडतील, अशी अपेक्षा विकास देशमुख यांनी व्यक्त केली. आर्टिफिशल इंटेलिजन्स अभ्यासक्रम शुभारंभाच्या निमित्ताने एका विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आभार मानले