आयजीएम ३०० खाटांचे करुन १५ दिवसात सीटीस्कॅन मशीन बसविण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोल्हापूर, दि.१५: आयजीएम रुग्णालय 300 खाटांचे करण्याचा निर्णय घेतानाच 15 दिवसात सी टी स्कॅन मशीन बसवा, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयाबाबतच्या सुविधा आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज आयजीएम रुग्णालयात बैठक घेतली. बैठकीला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री. श्री मुश्रीफ म्हणाले, आवश्यक असणारे मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने भरुन घ्यावे. जिल्हा नियोजनमधून सी टी स्कॅन मशीन बसवण्यासाठी प्रस्ताव देवून, 15 दिवसात त्याच्या पूर्तता करावी. त्याचबरोबर आणखी एक ऑक्सीजन टँक बसवावा. आवश्यक ती ऑक्सीजन पुरवठा पाईप लाईनची कामे करुन घ्यावीत.

तिसऱ्या लाटेची पूर्व तयारी म्हणून लहान मुलांच्या उपचारासाठी 10 खाटांचा वार्ड करावा. जिल्हा शल्यचिकित्सकांनी आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करावा. 42 कर्मचारी भरती प्रकरणी पाठपुरावा करुन तो प्रश्न मार्गी लावला जाईल. जिल्ह्यासाठी लागणाऱ्या ऑक्सीजन पुरवठा वाढविण्यासाठी विभागीय आयुक्तांना सूचना दिली जाईल. त्याचबरोबर रेमडेसिवीरच्या कोट्यातही वाढ झाल्याने पुरवठा सुरळीत होईल. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी काटेकोरपणे कारवाई करावी.

आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, लहान मुलांच्या उपचारासाठी 10 खाटांचा वार्ड करुन त्याबाबत प्राणवायूसह आवश्यक सुविधांचे नियोजन करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही औषधांसह आवश्यक साहित्यांचा पुरवठा करा.  खासदार श्री. माने यांनीही लवकरात लवकर 300 खाटांचे सर्व सुविधेसह रुग्णालय सुरु करण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे सांगितले. जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्हा नियोजनमधून आयजीएममध्ये दोन पीएसए ऑक्सीजन जनरेशन प्लँट निर्मिती होणार आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्रकुमार शेट्ये यांनी सुरुवातीला सविस्तर आढावा दिला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!