दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२३ । मुंबई । राज्यातील पाणंद रस्ते शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी गरजेचे आहेत. या पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यासाठी सकारात्मक विचार करणार असल्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव स.अं.साळुंखे, प्रधानमंत्री ग्रामीण रस्ते विभागाचे सचिव ख.तु. पाटील, रोजगार हमी योजना विभागाच्या उपसचिव संजना खोपडे यांच्यासह मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. महाजन म्हणाले, शेत/पाणंद रस्ते हे अवर्गीकृत स्वरुपाचे रस्ते आहेत. या रस्त्यांना दर्जोन्नत करून ग्रामीण मार्गाचा दर्जा द्यावयाचा झाल्यास प्रथम त्यांचा समावेश रस्ते विकास आराखड्यामध्ये करणे आवश्यक असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामविकास विभाग यांनी समन्वयाने कार्यवाही करून राज्यातील पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यात येतील. राज्यातील पानंद रस्ते हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील शेतीमालाची ने-आण करणे तसेच शेतातील उत्पादित मालाची बाजारपेठेसाठी वाहतूक करणे गरजेचे असून पावसाळ्यात रस्त्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन त्रासाला सामोरे जावे लागते. या मुळे पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.