दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑगस्ट २०२२ । मुंबई । जिल्हा परिषदेमधील केंद्रप्रमुखांच्या पदोन्नती व वेतन निश्चितीच्या प्रकरणाबाबत शिक्षण, वित्त व ग्रामविकास या विभागांमध्ये सुसूत्रता आणून या विभागाच्या समन्वयातून हा विषय तातडीने मार्गी लावू, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत सांगितले.
बुलढाणा जिल्हा परिषदेमधील केंद्रप्रमुख यांची पदोन्नती व वेतन निश्चितीची प्रकरणाच्या अनुषंगाने डॉ.रणजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.महाजन बोलत होते.
ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले, जिल्हा परिषद शिक्षकांच्या, केंद्रप्रमुखांच्या असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील. जिल्हा परिषद ही कार्यान्वयीन यंत्रणा असल्यामुळे शालेय शिक्षण विभाग याबाबत धोरण निश्चित करत असते. हे लक्षात घेऊन वित्त, शालेय शिक्षण आणि ग्रामविकास विभाग यांची एकत्रितपणे बैठक घेऊन सर्व जिल्ह्यांसाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यात येईल. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व सुसूत्रता आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही श्री. महाजन यांनी सांगितले.
या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री विक्रम काळे, राम शिंदे, सुरेश धस यांनी सहभाग घेतला.