
स्थैर्य, सातारा, दि. 3 नोव्हेंबर : ’टॉप गिअर जावळी जोडी रन’च्या सहाव्या मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ऐतिहासिक जावळी खोर्यात, वेण्णा जलाशयाच्या काठावर जोडीने रनर्स धावणार आहेत. ही स्पर्धा येत्या नऊ नोव्हेंबरला मेढा ते कुसुंबी या मार्गावर रंगणार असल्याची माहिती रनर्स स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ डिगे यांनी दिली.
यावेळी सचिव संजय धनावडे, संचालक सुहास पाटील, संतोष कदम, अविनाश कारंजकर, रवींद्र – शिंदे आदी उपस्थित होते. मॅरेथॉन स्पर्धा 10 किलोमीटर अंतराची असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत चार किलोमीटरचे फन रन असणार आहे. 90 विजेते असणारी ही स्पर्धा 15 ते 25, 25 ते 35, 35 ते 45, 45 ते 65 अशा विविध वयोगटांत होणार असून, विजेत्यांना पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
श्री. डिगे म्हणाले, रविवारी (ता. नऊ) सकाळी साडेसहा वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजेभोसले यांच्या हस्ते व टॉप गिअरचे श्रीकांत पवार, तहसीलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात येईल. राज्याच्या विविध भागांतून सुमारे तेराशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून, स्थानिक जावळीकरही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा म्हणजे जगातील एकमेव जोडी रन असून, दोघांना बेल्ट लावून जोडीने धावावे लागते.
या स्पर्धेचा शनिवारी (ता. आठ) सातारा येथे एक्स्पो असून, त्यामध्ये 1300 पेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग असणार आहे. त्याचबरोबर धाव मार्गावर दोन ठिकाणी रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे. मेडिकल व फिजिओ पथक मुख्य मैदानावर उपस्थित असणार आहे.स्पर्धकांना धावताना पाणी, ग्लुकोज, फळे, चॉकलेट, ओआरएस याचा पुरवठा व्हावा म्हणून पाच ठिकाणी वॉटर स्टेशन असणार आहेत.ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट असतील, संपूर्ण धाव मार्गावर ड्रोनच्या माध्यमातून चित्रफीत केली जाणार आहे. स्पर्धेसाठी शशिकांत शिंदे महाविद्यालय, वेण्णा कॉलेज, जावली अॅकॅडमीतील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून कार्यरत असणार आहेत. स्पर्धेच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मेढा पोलिस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त असणार आहे.स्पर्धेच्या दरम्यान या मार्गावरून कुसुंबीकडे अथवा मेढ्याकडे होणारी वाहतूक सकाळी सहा ते आठ या वेळेत पूर्ण बंद राहणार आहे. त्यामुळे दूध विक्रेते व मुंबईवरून गावाला येणार्या प्रवासी बस व अन्य प्रवाशांनी या मॅरेथॉनसाठी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळत असून, जावळीकरांनी उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

