पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांना निवेदन देताना भरत राऊत, धनंजय क्षीरसागर, सी. एम. पाटील, शिवाजी सर्वगोड, सचिन माळी, राजेंद्र चव्हाण आदी ( छाया :समीर तांबोळी )
स्थैर्य, कातरखटाव, दि. ०७ : वाकेश्वर (ता. खटाव) येथील करंजओढ्यावरील साकव पुल व येरळा नदीवरील फरशी पुलाचे काम तातडीने मंजूर करावे या मागणीसाठी ग्रामस्थांच्या शिष्ट मंडळाने राज्याचे सहकार तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे धाव घेतली आहे.
ना. पाटील यांना दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी, वाकेश्वर येथील करंज ओढ्यावरुन गांव परीसरातील रानमळा, चेंडू मळवी, रामोशी वस्ती, ढोल तसेच रानमळा (कुरोली) या वस्तीवर जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर वाकेश्वर येथील दत्तात्रय राऊत, भरत राऊत यांनी स्वखर्च व श्रमदानाने कच्चा साकव तयार केला होता. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे हा साकव वाहून गेला. सद्या या मार्गावरुन दैनंदिन वाहतुक असणार्या दुध उत्पादकांची मोठी कुचंबना होत आहे. शिवाय खरीप हंगामातील शेतीमालाची वाहतुक, रब्बी हंगाम मशागत पेरणी याकरीता ट्र:क्टर व इतर वाहने नेणे गैरसोयीचे झाले आहे.
दुसर्या बाजूला वाकेश्वर – सिध्देश्वर कुरोली, नायकाचीवाडी या गावांना जोडणारा रस्ता येरळा नदीतून आहे. नदीपलीकडील कुरोली हद्दीत वाकेश्वर येथील अनेक शेतकर्यांच्या जमीनी आहेत. सद्या या शेतकर्यांना फरशी पुल नसल्याने कंबरेबरोबर पाण्यातून जीव मुठीत घेवून जनावरांसह प्रवास करावा लागत आहे. पुल नसल्यामुळे मागील चार वर्षात एका मागासवर्गीय कार्यकर्त्यास आपला जीवही गमवावा लागला होता. तर सद्या शेतात जाण्यासाठी वडूजमार्गे 8 ते 10 कि.मी. प्रवास करुन जावे लागत आहे. या द्रविडी प्राणायमामुळे लोकांचा वेळ व श्रम वाया जात आहेत.
सामाजिक कार्यकर्ते भरत राऊत व धनंजय क्षीरसागर यांनी मंत्री पाटील यांच्याकडे निवेदन दिले. या निवेदनावर सरपंच सौ. पुष्पा नामदेव फडतरे, सोसायटीचे उपाध्यक्ष दिलीप फडतरे, माजी अध्यक्ष हणमंत फडतरे, डॉ. राजेंद्र फडतरे, संजय फडतरे, दत्तात्रय फडतरे, तानाजी फडतरे, रुपेश मदने, अशोक राऊत, नामदेव राऊत, आनंदराव राऊत, मुरलीधर राऊत, दत्तात्रय राऊत आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.