स्थैर्य, धुळे, दि.०३: धुळे शहर दातृत्वात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. कोरोना विषाणूबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनची उपलब्धता व्हावी म्हणून संजय सोया ग्रुपने सामाजिक दायीत्व दाखवत उभारलेला ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसह सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी वरदान ठरेल, असे सांगत कोरोना विषाणूची संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी नागरिकांनी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ‘संजय सोया ग्रुप’चे चेअरमन, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, संजय अग्रवाल यांच्या पुढाकारातून जनरेटरसह स्व. सुंदरबाई काशीनाथशेठ अग्रवाल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आज सकाळी विभागीय आयुक्त श्री. गमे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विनी भामरे, कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील आदी उपस्थित होते.
आयुक्त श्री.गमे म्हणाले, गेल्या एप्रिल महिन्यात ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. त्यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या पुढाकारातून हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा राहिला आहे. या प्रकल्पातून दररोज किमान 60 जम्बो सिलिंडर ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपुष्टात आलेला नाही. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली आहे. धुळे शहर व जिल्ह्यात तूर्तास कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या कमी दिसत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल केले असले, तरी नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, की ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास ‘संजय सोया’ ग्रुपने दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. माजी आमदार श्री. कदमबांडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. पाटील यांनी आभार मानले.