संवेदना हरवलेले शासनकर्ते..

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । सातारा । अगोदरच प्रचंड महागाईने जनता त्रस्त असताना आजपासून संपूर्ण देशभर जीवनावश्यक वस्तूंवर GST आकारणे सुरु झाले. म्हणजे माणसांच्या रोजच्या खाण्यातील सर्व डाळी, कडधान्ये, तेल, गहू-ज्वारी-बाजरी व इतर सर्वप्रकारचे पीठ (आटा) महाग होणार. त्याचवेळी घरातील दैनंदिन वापरातल्या सर्व वस्तूंवर 12 टक्क्यांऐवजी 18 टक्के GST लागू झाल्यामुळे त्याही सर्व वस्तू महाग होणार. भारतातील सर्वसामान्य जनतेने जगावे कसे असा प्रश्न पडला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी निर्ढावलेली शासन व्यवस्था लोक पाहात आहेत. गॅस, पेट्रोल, डिझेल, वीज, कपडे व सार्वजनिक वाहतूक आदी गोष्टींनी अगोदरच महागाईचे टोक गाठले आहे. आता या सरकारनिर्मित नव्या महागाईने जनतेचे कंबरडे मोडणार आहे. दोन वेळ कसेबसे पोट भरणाऱ्या कुटुंबाला आता एकवेळ पोटभर मिळणेही अवघड होऊन जाईल.

सरकार एवढा पैसा कशासाठी गोळा करीत आहे हे कळेनासे झाले आहे. सर्वसामान्य लोकांना यापूर्वी मिळणारी सर्व सबसिडी बंद झाली आहे, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणारी फी सवलत व स्कॉलरशिप जवळजवळ बंद झाली आहे, प्रवासातील सवलती बंद केल्या आहेत. मग पेट्रोल, डिझेल व गॅस चढ्या दारात विकून मिळालेल्या भरमसाठ नफ्याचे पैसे नेमके जातात कोठे? रोडवरुन धावणाऱ्या गाडीवाल्यांकडून अव्वाच्यासव्वा वसुल केला जात असलेला टोलचा पैसा नेमका कोठे जातोय? सर्व सरकारी कंपन्या विकून आलेला पैसा कोठे जातोय? रिझर्व बँकेतील सगळी गंगाजळी संपली आहे. ते पैसे गेले कोठे? या सरकारचे गणितच कळत नाही.. एक नक्की की, या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही, सामान्य माणसांना जगणे मुश्किल झाले तरी या सरकारवर त्याचा काही परिणाम होत नाही. संवेदना नसलेले हे सरकार आहे. त्यांना फक्त निवडणुका जिंकण्याचे व दुसऱ्या पक्षांची सरकारे पाडण्याचे ‘तंत्र’ चांगलेच अवगत झाले आहे. त्यासाठी आटापिटा करण्यात ते पटाईत आहेत पण महागाई कमी करुन जनतेला दिलासा देण्यासाठी त्यांचेकडे वेळ नाही, त्यासाठी बुध्दी पणाला लावली जात नाही. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 80 च्या खाली गेली आहे. देश गंभीर आर्थिक संकटाकडे वाटचाल करीत आहे याबद्दल सरकार दात आवळून गप्प आहे.

तुम्ही निवडणुका जिंकाल, दुसऱ्यांची सरकारे पाडण्यात यशस्वी व्हाल. पण देशातील जनतेची मनें नाही जिंकू शकणार! जनता महागाईने त्रस्त आहे व देश विनाशाच्या दिशेने निघालाय याचे भान असुद्या एवढीच अपेक्षा आहे.

जनतेनेही आता धर्म आणि जातीच्या बाहेर पडून देशातील सर्व जनतेचा व देशाच्या कल्याणकारी राज्य संकल्पनेचा विचार केला तर बरं होईल ही जनतेकडून अपेक्षा आहे.

©️ राजेंद्र शेलार, सातारा


Back to top button
Don`t copy text!