राज्यकर्त्यांनी साहित्यिकांची बूज राखली पाहिजे – कवी प्रदीप कांबळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
राज्यकर्त्यांनी साहित्यिकांची बूज राखली पाहिजे. छोट्या छोट्या साहित्य संमेलनातून अस्सल साहित्यिक घडले जातील. साहित्यिक प्रतिभा जोपासण्याचे काम विचारवंत व जेष्ठ साहित्यिकांनी करावे. मन, माता आणि माती लेखनाचे पहिले विषय असतात आणि हेच साहित्याचे चिरंतन सत्य आहे. राज्यकर्त्यांनी लेखकांकडे चांगल्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असे विचार प्रसिध्द कवी व्याख्याते प्रदीप कांबळे व्यक्त केले.

फलटण येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन, माणगंगा साहित्य परिषद व ज्ञानदीप शिक्षण संस्था आयोजित चौथ्या युवा स्पंदन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्रसिद्ध कवी व्याख्याते प्रदिप कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून युवा स्पंदन साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकररराव सोनवलकर, माणदेशी साहित्यिक व स्वागताध्यक्ष ताराचंद्र आवळे, जेष्ठ विचारवंत अरविंद मेहता, माजी संमेलनाध्यक्ष विकास शिंदे, युवा कवी अविनाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी दर्जेदार व आशयसंपन्न प्रकाशित पुस्तक यासाठी पंचवीस विविध प्रकारच्या पुस्तक लेखकांना ‘माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त प्रा.अरुण घोडके व डॉ. सुधीर बोकील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी साहित्यिक ताराचंद्र आवळे लिखित ‘एकाकी झुंज’ या पुस्तकाचे व अविनाश चव्हाण यांच्या प्रीतीचे दुःख या गीताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अविनाश चव्हाण यांना ‘युवा कवी’ हा किताब देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

एकदिवसीय साहित्य संमेलनात दुसर्‍या सत्रात कथाकथनकार सौ. रंजना सानप यांनी मानवी मनाला साद घालणारी कोरोना स्थितीची कथा सादर करून सर्वांची मने जिंकली. यावेळी जेष्ठ साहित्यीक सुरेश शिंदे यांनी कथेचा जन्म व त्याची उगमस्थाने कोणती, यावर मार्गदर्शन केले. यानंतरच्या सत्रात महाराष्ट्रातून आलेल्या कवींचे खुले ‘वसंतबहार’ कवी संमेलन पार पडले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी खंडाळा साहित्य परिषदेचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक विलास वरे होते. त्यांनी कविता वेदनेतून येते व समाजातील वास्तवावर भाष्य करते. नवकवींनी लिहिते राहिले पाहिजे, असेही वरे यांनी सांगितले. काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन रानकवी राहुल निकम यांनी केले. सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, ठाणे, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील पंचवीस कवींनी विविध ढंगातील व आशयाच्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.

उपस्थित कवींना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांनी जे समोर घडते त्यावर भाष्य केले पाहिजे व साहित्यिकांनी सत्याची कास धरून दर्जेदार साहित्य निर्माण केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी प्राचार्य शांताराम आवटे, ताराचंद्र आवळे, महादेव गुंजवटे, सुलेखा शिंदे, समन्वय प्रा.सौ. सुरेखा आवळे, राजेश पाटोळे, आबा आवळे, दत्तात्रय खरात, चैताली चव्हाण, आकाश आढाव व साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!