स्थैर्य, सातारा, दि.२०: सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे तब्बल 85 हजार रुपयांचे बिल थकल्याने महावितरणच्या धडक कारवाईत या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे दैनंदिन कामकाज ठप्प झाले. कारवाई झाल्यानंतर संपूर्ण कार्यालयात अंधाराचे साम्राज्य पसरले.
दरम्यान, परिवहन कार्यालयातील कर्मचार्यांसह तेथे वाहन परवान्याच्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना विनाकारण ताटकळावे लागले. पर्यायी इन व्हर्टर बॅकअप वर कामकाज चालविण्याची वेळ आली. या संदर्भात प्राप्त झालेल्या माहिती नुसार दरमहिन्याला साधारण आरटीओ कार्यालयाचे पंचवीस हजाराच्या आसपास वीजबिल दरमहिन्याला येते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आस्थापना व इतर दैनंदिन खर्चासाठी प्राप्त होणार्या अनुदानात वीस टकके कपात झाल्याने आरटीओ कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजाचा गाडा सध्या सुविधांअभावी अडथळ्याची शर्यत अनुभवतो आहे. जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्याचे 55 हजार मूळ बिल त्यांवर दंड व्याज आकारून 85 हजाराचे देणे आरटीओ कार्यालयाला भरायचे होते. मात्र, खर्च अनुदान वेळेत उपलब्ध न झाल्याने हे बिल भरण्यास विलंब झाला. त्यामुळे महावितरणच्या वसुली पथकाने शुक्रवारी सकाळी सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे वाहन परवाना नोंदणी व ऑनलाईन वाहन परिक्षांचे वेळापत्रक काही काळासाठी कोलमडले होते. महावितरणच्या कृष्णानगर येथील कार्यालयाशी संपर्क साधून वीज पुरवठा सुरळीत करण्याची विनंती लेखी पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश चौधरी यांनी दिली. मुख्य उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण काही कारणास्तव सुट्टीवर होते त्यांनी माहिती घेऊन तुम्हाला माहिती देतो असे प्रसार माध्यमांना सांगितले.