
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी साताऱ्यात खासगी दौरा करत जिल्हा सहकार्यवाह संदीप आठल्ये यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. कडक पोलीस बंदोबस्तात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
स्थैर्य, सातारा, दि. २९ मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी सायंकाळी साताऱ्यात खासगी दौरा केला. चिक्कोडी (बेळगाव) येथील कार्यक्रम आटोपून पुण्याकडे जाताना त्यांनी शहरातील व्यंकटपुरा पेठेत राहणारे संघाचे जिल्हा सहकार्यवाह संदीप आठल्ये यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
साधे भोजन आणि कार्यकर्त्यांशी संवाद
यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी थालीपीठ आणि दहीभात असे साधे भोजन घेतले. संघाच्या स्थानिक कार्यकारिणीतील सुमारे ३० कार्यकर्त्यांशी त्यांनी अनौपचारिक गप्पा मारत मनमोकळा संवाद साधला. शनिवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता साताऱ्यात आलेले भागवत दीड तासाच्या अल्पविरामानंतर साडेसात वाजता पुण्याकडे रवाना झाले. हा दौरा पूर्णपणे खासगी असल्याने कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा लोकप्रतिनिधीला भेटण्यास मनाई करण्यात आली होती.
‘झेड प्लस’ सुरक्षेमुळे पोलीस छावणीचे स्वरूप
सरसंघचालक भागवत यांना सीआयएसएफकडून ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा असल्याने साताऱ्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुमारे १०० पोलिसांचा फौजफाटा, मोबाईल जॅमर आणि बुलेटप्रूफ गाड्यांचा ताफा त्यांच्या सुरक्षेसाठी होता. उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, कराडचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप आणि वाईचे अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शाहूपुरी पोलीस ठाणे ‘सेफ हाऊस’
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाणे ‘सेफ हाऊस’ म्हणून निश्चित केले होते, तर यशवंत हॉस्पिटलही राखीव ठेवण्यात आले होते. अपार्टमेंटमधील रहिवाशांना आधीच सूचना देऊन त्यांच्यासाठी विशेष पासेस जारी केले होते.
दरम्यान, सरसंघचालक भागवत यांचा साताऱ्यातील हा दुसरा दौरा असून यापूर्वी ते २०१२ मध्ये कोटेश्वर मैदानावर आयोजित कार्यक्रमासाठी आले होते, अशी माहिती जिल्हा कार्यवाह महेश शिवदे यांनी दिली.

