लोकसभा निवडणूकीत रासप झेंडा दिल्लीत नक्की पोहोचणार : माजी मंत्री महादेव जानकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२३ । फलटण । म. फुले यांच्या विचारांची चळवळ आणि राजकारण याची गल्लत करु नका असे सांगत राष्ट्रीय समाज पक्षाने गेली २० वर्षे म. फुले यांचा विचार आणि आदर्श घेऊन वाटचाल सुरु ठेवली आहे, त्यातून उपेक्षितांच्या पोरांना अपेक्षीत ठिकाणी पोहोचता यावे यासाठी रासप प्रयत्नशील असून त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा मिळणारा पाठिंबा पहाता आमची वाटचाल योग्य दिशेने सुरु असून आगामी लोकसभा निवडणूकीत रासप झेंडा दिल्लीत नक्की पोहोचणार याची ग्वाही माजी मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट शब्दात दिली.

माढा लोकसभा मतदार संघातून दि. १० व ११ जुलै असे २ दिवस आयोजित करण्यात आलेल्या जन सुराज यात्रेचा (रॅली) समारोप फलटण येथील जाहीर सभेने करण्यात आला, त्यावेळी सभेत महादेव जानकर बोलत होते. यावेळी रासप केंद्रीय मुख्य सचिव सुशीलकुमार पाल, राष्ट्रीय सरचिटणीस बाळासाहेब लेंगरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, प्रदेश उपाध्यक्ष बबनदादा वीरकर, प्रदेश मुख्य सचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश सचिव भाऊसाहेब वाघ, प्रदेश विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शरद दडस, माण बाजार समिती उप सभापती सौ. वैशाली वीरकर, मराठवाडा अध्यक्ष विष्णू गोरे, प. महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक व श्रीकांत देवकर, फलटण तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण, फलटण तालुका महिला आघाडी अध्यक्षा निशा माने, युवक अध्यक्ष नीलेश लांडगे यांच्यासह विविध प्रांतातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते, फलटण व पंचक्रोशीतील ग्रामस्थ स्त्री – पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासाच्या घोषणा आणि संकल्पना वेगळ्या पद्धतीने मांडत असली तरी माणसे तीच आहेत, फक्त झेंडे बदलून त्याच मोजक्या कुटुंबातील मंडळी सत्तेत आहेत, त्यांची मुले खासदार, आमदार होतात मात्र तुम्ही कायम मतदार आहात याची नोंद घ्या आणि आता मतदार नव्हे राज्यकर्ते व्हा असे आवाहन करताना तुमच्या कुटुंबात ३ मुले असतील तर एक उद्योगपती, एक आयएएस/आयपीएस अधिकारी आणि एक आमदार खासदार झाला पाहिजे त्याशिवाय हिंदुस्थान खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला असे दिसणार नसल्याचे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.

रासपने महाराष्ट्रासह विविध राज्यात लढविलेल्या निवडणूकांमध्ये आपण जातींचा विचार केला नाही, म्हणूनच मराठा समाजाचे ४ आमदार, १०० वर जिल्हा परिषद सदस्य मराठा, मुसलमान, जैनांचे केले, गुजराथ मध्ये २८ सदस्य नगर परिषदेत निवडून आले आहेत, अशी परिस्थिती असूनही आपल्याला धनगर समाजाचा म्हणून हिनविले जाते, आई – वडील धनगर समाजाचे आहेत यात त्यांचा माझा काय गुन्हा असा सवाल करीत माझी कामाची पद्धत बघा, मी सलग २० वर्षे सर्वांना बरोबर घेऊन लोक हिताला प्राधान्य देवून काम करीत राहिलो असल्याचे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.

मी ओबीसी समाजाचा आहे, पंतप्रधान ओबीसी समाजाचे असल्याचे सांगितले जात असेल तर मग त्यांचा ओबीसी जनगणनेला विरोध का असा सवाल करीत या
देशात जात निहाय जनगणना करण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे जातनिहाय संख्या निश्चित झाली तर सर्वांना विकासाची संधी देता येईल, संख्या निहाय योजना आखून विकास गतिमान करता येईल असे प्रतिपादन महादेव जानकर यांनी केले.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजराथ वगैरे राज्यात अनेक लोकप्रतिनिधी रासपच्या चिन्हा वर विजयी झाले, परभणी येथे आमच्या पक्षाचा आमदार आहे, आता खासदार होण्यासाठी उमेदवारी जाहीर करण्याची मागणी आहे, आपल्याला मंत्री केल्याचे सांगताना भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही साथ केली हे विसरता येणार नाही, माढा ही केवळ झलक आहे, आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघात हीच भूमिका घेऊन लोक जागृतीचा आपला प्रयत्न आहे, असे सांगताना महाराष्ट्र विधान सभेत रासपचे १५ आमदार निवडून आणा राज्याचा मुख्यमंत्री आपण ठरवू शकणार असल्याचे महादेव जानकर यांनी आवर्जून सांगितले.

यासभेत सुशीलकुमार पाल, बाळासाहेब लेंगरे,  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, मराठवाडा अध्यक्ष विष्णू गोरे वगैरेंची भाषणे झाली. प्रारंभी संतोष ठोंबरे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात जन सुराज रॅली संबंधी माहिती विस्ताराने दिली. पक्षाचे पुरंदर तालुकाध्यक्ष संजय निगडे यांनी या सभेचे सूत्रसंचालन आणि शेवटी समारोप व आभार रासप जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!