दैनिक स्थैर्य । दि. २७ जुन २०२१ । सातारा । सदर बझार येथील शिंदे कॉलनी सर्वे नं 460/अ10, प्लॉट नं 7 येथील अवर लेडिज एज्युकेशन सोसायटीच्या वतीने चालविण्यात येणारी सराह लिना या शाळेची आरटीई मान्यता रद्द करण्याची शिफारस शिक्षण विभागाने केली आहे. ही शाळा विनापरवाना असून पालकांनी या बोगस शाळेपासून सावध राहण्याचे आवाहन रिपाई गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
शिंदे कॉलनी सदर बझार येथे सराह लिना या शाळेच्या बोगसगिरीची पोलखोल गाडे यांनी पर्याप्त दस्तऐवज सादर करून केली. ते पुढे म्हणाले या शाळेने शालेय सुविधांची पूर्ती न केल्याने शिक्षण विभागाने दोन वर्षापूर्वीच आरटीई मान्यता रद्द केली आहे. सातारा पालिकेने या शाळेच्या इमारतीला कोणतेही भोगवटा प्रमाणपत्र दिलेले नाही. या इमारतीची मूळ परवानगी निवासी रहिवासासाठी आहे. शाळेतील अपुर्या जागा व सुविधा यामुळे शाळा आणि कॉलनीतील रहिवाशी यांची सुरक्षितता करोना संक्रमणाच्या दृष्टीने राहू शकत नाही. कमी विद्यार्थी संख्या, विहित निकषानुसार रोस्टर, पुरुष व महिलांच्या स्वच्छता गृहाचा अभाव, शैक्षणिक साधनांची कमतरता, अप्रशिक्षित शिक्षक या कोणत्याच निकषात शाळा बसत नाही. या शाळेची मान्यता तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी संजय गाडे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली आहे.