दैनिक स्थैर्य | दि. १८ डिसेंबर २०२४ | फलटण |
परभणी येथील भीमसैनिकांवरील संविधानाचा अपमान, लाठीचार्ज केल्याच्या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), फलटण तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना रिपांईतर्फे देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
परभणी येथे गावगुंडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील संविधानाच्या प्रतिकृती (प्रतिमा) व्देषभावनेतून व जातीयवादी भावनेतून मोडतोड करून पायदळी तुडविल्याने साहजिकच तेथील भीमसैनिकांचा संताप अनावर होवून ते एकत्र जमले असताना पोलिसांनी तेथील भीमसैनिकांवर तुफान लाठीचार्ज केला. यावेळी अनेक भीमसैनिक जखमी झाले. तसेच त्यांच्या घरांमध्ये घुसून मारहाण करून अनेक भीमसैनिकांना जेलमध्ये टाकले आहे. तसेच पोलिसांच्या मारहाणीत परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेत सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी गेला आहे. हा लाठीचार्ज करणार्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी व शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचे पुर्नवसन करून त्यांना आर्थिक सहाय्य करावे. त्याचप्रमाणे आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करून गुन्हे मागे घ्यावेत. तसेच जातीयवादी व मनुवादी गावगुंडांवर गुन्हे दाखल व्हावेत आदी मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) फलटण तालुका व शहरच्या वतीने प्रांताधिकार्यांना देण्यात आले.
हे निवेदन देताना संघटनेचे मधुकर काकडे – संघटक, पश्चिम महाराष्ट्र, विजय येवले – जिल्हा सचिव, राजु मारुडा – जिल्हा उपाध्यक्ष, मुन्ना शेख – जिल्हा सरचिटणीस, संजय निकाळजे – जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सतिश अहिवळे – तालुका अध्यक्ष, लक्ष्मण अहिवळे – शहर अध्यक्ष, विमलताई काकडे – तालुका अध्यक्ष, राखी कांबळे – शहर अध्यक्ष, विशाल मोहिते – सचिव व वैभव मोहिते उपस्थित होते.