
स्थैर्य, सातारा, दि. 30 सप्टेंबर : महाराष्ट्रात विशेषकरुन मराठवाडा, कोकण, सातारा जिल्ह्यातील पूर्व भाग तसेच एकंदरीत संपूर्ण देशात वरुणराजाने हाहा:कार माजवला आहे. पूरबाधितांच्या गंभीर परिस्थितीचे पार्श्वभूमीवर गुरुवार, दि. 02 आक्टोंबर 25 रोजीचा सातारचा विजयादशमी सिमोल्लंघन सोहळा अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली असून, शासनाचा यावर्षीचा निधी पूरबाधितांच्या मदत कार्यासाठी परस्पर वर्ग करावा तसेच नागरिकांनीही माणुसकीच्या भावनेतून शक्य असेल ती मदत जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये करावी असे आवाहन केले आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, गेल्या काही दिवसापासून संपूर्ण देशभरात आणि विशेषकरुन महाराष्टराज्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी जीवित आणि मोठया प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा शेतकरी तर उध्वस्त झाला आहे. शहरी तसेच ग्रामिण भागात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
एकंदरीत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत सातारचा शाही विजयादशमी आणि सिमोल्लंघन सोहळा थाटामाटात, धूमधडाक्यात, डामडौलात करणे हे आमच्या मनाला पटणारे नाही. पावसामुळे मराठवाडयासह हाहाक्कार झालेल्या ठिकाणी मोठ्या मदतीची गरज आहे. त्यामुळे शाही दसरा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरीकाने एक भारतीय म्हणून पूरबाधितांच्या मदत कार्यासाठी शक्य होईल तितकी आर्थिक किंवा वस्तु किंवा धान्य स्वरुपातील मदत, जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये जमा करावी असेही आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.