रोटरी – क्रीडाईचे अभिमानास्पद काम – पालकमंत्री सतेज पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


ग्रामीण भागात कोरोना केंद्राच्या माध्यमातून सुविधा तयार करावी

स्थैर्य, कोल्हापूर, दि. २ : रोटरी आणि क्रीडाई या दोन्ही संस्थांनी नेहमीच मदतीसाठी पुढे येत अभिमानास्पद काम केले आहे. ग्रामीण भागात कोरोना केंद्राच्या माध्यमातून सुविधा निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.

रोटरी मुव्हमेंट, क्रीडाईने जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉल मध्ये उभे केलेल्या कोविड-१९ केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, क्रीडाईचे राज्याचे अध्यक्ष राजीव परीख, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, सचिव ऋषिकेश केसकर, रोटरी मुव्हमेंटचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, क्रीडाई आणि रोटरी या दोन्ही संस्थांना मनापासून धन्यवाद देतो. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या दोन्ही संस्थांना व्हेंटीलेटर देण्याबाबत आवाहन केले होते. त्याचबरोबर बेडचे नियोजनही करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. एकूण पाचशे अडतीस बेडची नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी महासैनिक दरबार येथे १२५ बेडची सुविधा देण्यात आली आहे. येत्या काळात या दोन्ही संस्थांनी नियोजन करुन ग्रामीण भागात कायमस्वरुपी सुविधा उभी करावी असेही ते म्हणाले.

संग्राम पाटील यावेळी म्हणाले, बारा रोटरी क्लब एकत्र येऊन ६२ लाख रुपयांच्या माध्यमातून ५३८ बेडची सुविधा निर्माण केली आहे. आयसोलेशन रुग्णालय आणि सावित्रीबाई फुले रुग्णालय येथेही स्वतंत्र रोटरी वॉर्ड करण्यात येणार आहे.

क्रीडाईचे अध्यक्ष श्री. बेडेकर यांनी सर्वांचे स्वागत करुन १२५ बेडची सुविधा केली असून त्यासाठी ऑक्सीजनची सुविधाही देण्यात येणार आहे, असे सांगितले.

यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल प्रताप पुराणिक, प्रकाश जगदाळे, एस. एस. पाटील, उत्कर्षा पाटील, एम. वाय. पाटील, मेघना शेळके, योगिनी कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

रोटरीने अँटीजेन टेस्टींग केंद्र उभे करावे पल्स पोलिओचे मोहीम रोटरीने हाती घेऊन पोलिओ मुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. रोटेरियन म्हणून मला त्याचा अभिमान आहे. रोटरीला अँटीजेन टेस्टींग किट पुरविले जातील. त्यांनी अँटीजेन टेस्टींग केंद्र उभे करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!